Viju Khote Birthday : 'शोले' या आयकॉनिक चित्रपटातील 'कितने आदमी थे' हा संवाद आजही प्रेक्षकांच्या तितकाच पसंतीचा आहे. हा डायलॉग आठवला की, डोळ्यांसमोर येणारा चेहरा म्हणजे डाकू गब्बर सिंहच्या टोळीचा सदस्य 'कालिया' अर्थात अभिनेते विजू खोटे. 'कालिया'ची भूमिका प्रेक्षकांमध्ये इतकी लोकप्रिय झाली की, आजही तिची सर्रास कॉपी होताना दिसत आहे. १९७५ मध्ये आलेल्या 'शोले' या चित्रपटात 'कालिया'ची भूमिका अभिनेते विजू खोटे यांनी केली होती. या चित्रपटातील त्यांची भूमिका केवळ ७ मिनिटांची होती, परंतु त्यांनी आपल्या छोट्याशा भूमिकेने प्रेक्षकांच्या हृदयावर खोलवर छाप सोडली.
आज (१७ डिसेंबर) अभिनेते विजू खोटे यांची जयंती. विजू खोटे जारी आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या अभिनयामुळे ते आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. 'शोले' मधील ७ मिनिटांच्या भूमिकेत आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी चित्रपटातील प्रमुख खलनायक अमजद खान यांच्यासह प्रमुख अभिनेते अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनाही टक्कर दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटातील या छोट्या भूमिकेसाठी त्यांना फक्त २५०० रुपये फी मिळाली होती. मात्र, त्या काळात हातात चित्रपटांच्या ऑफर्स नसल्यामुळे विजू खोटे यांनी लगेचच या चित्रपटाच्या ऑफरला होकार दिला होता.
‘शोले’ चित्रपटातील भूमिका आपल्याला कशी मिळाली याचा किस्सा एकदा त्यांनी स्वतः शेअर केला होता. एका मुलाखतीत विजू खोटे यांनी हा किस्सा सांगताना म्हटले की, 'एक दिवस अचानक त्यांना डायरेक्टर रमेश सिप्पी यांच्या ऑफिसमधून फोन आला आणि भेटायला बोलावण्यात आले. ते ऑफिसमध्ये जात असताना अमजद खान तिथून जात होते. अमजद खान त्यांच्याकडे वळले आणि म्हणाले की, ही चांगली भूमिका आहे, म्हणून हो म्हण. आणि मग अशा प्रकारे विजू यांनी कालियाच्या भूमिकेसाठी होकार दिला. विजू आणि अमजद खान हे एकाच थिएटर ग्रुपचे भाग होते आणि त्यांनी अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केले होते.
'शोले' व्यतिरिक्त विजू खोटे राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'अंदाज अपना अपना' या चित्रपटासाठीही ओळखले जातात. या चित्रपटात त्यांचा 'गलती से मिस्टेक हो गई' हा डायलॉग ऐकताच प्रेक्षक हसू लागतात. या चित्रपटातील त्यांची भूमिकाही खूपच लहान होती, परंतु त्याच्या अप्रतिम कॉमिक टायमिंगमुळे आणि दमदार अभिनयामुळे या चित्रपटातही ते आपला प्रभाव दाखवण्यात यशस्वी झाला.
संबंधित बातम्या