Happy Birthday Vijay Sethupathi : अभिनेता विजय सेतुपती हे नाव माहीत नाही, असं आजच्या काळात कुणीही नाही. आपल्या नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या विजय सेतुपती याने आपल्या कारकिर्दीत असे अनेक चित्रपट दिले आहेत, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. इंडस्ट्रीतील अनुभवी कलाकारांच्या यादीत विजयच्या नावाचा समावेश होतो. आज यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या विजय सेतुपती याच्या आयुष्यात एक काळ असा होता, जेव्हा त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. त्याच्या सुपरस्टार होण्याआधीपासून ते सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता.
१६ जानेवारी १९७८ रोजी जन्मलेल्या विजय सेतुपती याने हिंदी तसेच मल्याळम, तेलुगू आणि कन्नड भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत एक राष्ट्रीय पुरस्कार, दोन फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण आणि दोन तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार देखील मिळाले आहेत. परंतु, फार कमी लोकांना माहित असेल की चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी तो दुबईमध्ये अकाउंटंट म्हणून काम करायचा. विजयला सुरुवातीपासूनच फिल्मी दुनियेत येण्याची इच्छा होती, त्यामुळेच तो दुबईतील अकाउंटंटची नोकरी सोडून भारतात परतला. भारतात आल्यानंतर त्याने छोट्या छोट्या भूमिका करून करिअरला सुरुवात केली. यानंतर त्याने अनेक टीव्ही शो आणि शॉर्ट फिल्म्समध्येही काम केले आणि त्यानंतर त्याला कार्तिक सुब्बाराजच्या चित्रपटातून ब्रेक मिळाला.
साधी पँट, शर्ट आणि पायात चप्पल घातलेला विजय सेतुपती सामान्य माणसासारखा दिसतो. तो एवढा मोठा सुपरस्टार आहे हे त्याच्याकडे पाहून लक्षातही येत नाही. विजय सेतुपतीने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता की, तो उंची आणि शरीरयष्टीमध्ये अगदी सामान्य माणसासारखा आहे आणि त्याच्याकडे इतर अभिनेत्यांप्रमाणे सिक्स ॲब्स किंवा स्टायलिश शैली नाही. यासाठी त्याला इंडस्ट्रीत बॉडी शेमिंगही केले गेले.
विजय सेतुपती हा मनोरंजन विश्वाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातील आहे. अभिनय करण्यापूर्वी त्यांनी एका रिटेल स्टोअरमध्ये सेल्समन, फास्ट फूड जॉइंटमध्ये कॅशियर आणि पॉकेटमनीसाठी फोन बूथ ऑपरेटर म्हणून काम केले. या सर्व गोष्टींना कंटाळून त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. यानंतर, वयाच्या १६व्या वर्षी त्याने 'नम्मावर'च्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले, जिथे त्याला कमी उंचीमुळे नाकारण्यात आले. या अभिनेत्याने आयुष्यात खूप संघर्ष केला. आज विजय सेतुपती त्याच्या एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेतो. दक्षिणेपासून ते बॉलिवूडपर्यंतच्या टॉप कलाकारांच्या यादीत त्याचा समावेश आहे.
संबंधित बातम्या