Vijay Raaz out from Son Of Sardaar 2: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यांच्या ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ‘सन ऑफ सरदार २’ची टीम शूटिंगसाठी लंडनला पोहोचली होती. त्याचवेळी बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या विजय राजविषयी एक बातमी समोर आली होती. विजय राजला या चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचे म्हटले गेले होते. याबद्दल बोलताना निर्मात्यांच्या वतीने असे म्हटले जात होते की, विजय राज सेटवर नखरे दाखवत होता, त्यानंतर त्याला चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. आता अभिनेता विजय राजने या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपली प्रतिमा मलीन केल्याचा आरोप त्याने केला आहे.
ईटाइम्सला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत विजय राजने खुलासा केला की, ‘४ ऑगस्ट रोजी त्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते, परंतु आता या प्रकरणाचे प्रमोशन केले जात आहे. मला मिळालेले आगाऊ पैसे परत करण्यास मी नकार दिल्याने हे केले जात आहे आणि आता ते मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत.’ विजय राज म्हणाला की, ‘मी कुमार मंगत यांना सांगितले की, जेव्हा ते शूटिंग संपवून लंडनहून परत येतील, तेव्हा आपण याबद्दल चर्चा करू. त्यांनी माझा वेळ वाया घालवला, माझा अपमान केला आणि इंडस्ट्रीत माझी प्रतिमा मलीन केली आहे. त्यांनी मला चित्रपटातून काढून टाकले आणि नियम असा आहे की, जर कलाकाराला काढून टाकण्यात आले, तर तो पैसे परत करण्यास बांधील नाही. जर मी चित्रपट सोडला असता तर मी आगाऊ रक्कम परत केली असती.'
पुढे विजय राज म्हणाला की, 'गुरुवारी मला कुमार मंगतचा फोन आला आणि जेव्हा मी आगाऊ रक्कम परत करण्यास नकार दिला तेव्हा त्याने माझ्या जीवाची धमकी देत मला घाबरवण्यास सुरुवात केली. मी काय केले? त्याचा अहंकार दुखावला का? पण यामुळे त्यांना कोणाच्याही जीवाशी खेळण्याचा अधिकार मिळत नाही.' यानंतर विजय राज याने आपल्याला चित्रपटातून का काढून टाकण्यात आलं हे स्पष्ट केलं.
विजय राज म्हणाला. ‘मी ३ ऑगस्टला लंडनला पोहोचलो आणि शूटिंगसाठी माझ्या छोट्याशा खोलीत गेलो. मी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आशिषला सांगितले की, बघा मला थोडी मोठी जागा मिळू शकते का? कारण मला रोज सकाळी योगा करावा लागतो. मोठी खोली मिळाली तर बरे होईल. ’ यावर आशिषने त्याला मोठी खोली मिळेल असे सांगितले आणि सेटवर येण्यास सांगितले.
त्यानंतर विजयने शूटिंगची गोष्ट सांगितली. तो म्हणाला, 'मी लोकेशनवर पोहोचलो आणि माझ्या व्हॅनमध्ये बसलो. कारण माझ्या शूटिंगसाठी वेळ होता. आशिष माझ्या व्हॅनमध्ये आला, त्याच्यासोबत रवी किशनही आला आणि कुमार मंगत मला भेटायला त्याच्यासोबत आला. २० मिनिटांनी तो परत आला आणि मला म्हणाला की, तुला खूप प्रॉब्लेम आहे, तू निघून जा.' मी म्हणालो मी जाईन, पण त्यानंतर तो मला सांगू लागला की तुझ्या स्पॉट बॉयची फीही अजय देवगणच्या स्पॉट बॉयपेक्षा जास्त आहे. मी त्याला विचारले की, जेव्हा मी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी होकार दिला, तेव्हा तुला हे सगळं माहित होतं ना? तू आता मला हे सर्व का सांगत आहेस? आणि शूटिंग भारतात नाही तर लंडनमध्ये होते. लंडनमध्ये उतरल्यानंतर कोणीही फी ठरवणार नाही.
अजय देवगणकडे दुर्लक्ष केल्याने विजयला काढून टाकण्यात आल्याचे देखील म्हटले जात होते. याबद्दलही विजयने सांगितले. तो म्हणाला की, ‘आम्हा दोघांचा थेट संपर्क आलाच नाही. मी रवी किशन आणि कॅमेरामन असीम बजाज आणि चित्रपटाचे दिग्दर्शक यांच्यासोबत लोकेशनवर गप्पा मारत होतो. अजय देवगण माझ्यापासून २५ मीटर अंतरावर होता आणि कोणाशी तरी बोलत होता आणि नंतर पुन्हा सेटवर आला. मी सेटवर परत गेलो नाही. कारण माझं शूटिंग दुसऱ्या ठिकाणी सुरू होतं आणि त्यानंतर मी कुमार मंगत माझ्याकडे आला आणि त्याने मला सेट सोडण्यास सांगितले.’