Vijay Deverakonda-Rashmika Mandanna Engagement: अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची नावे बऱ्याच काळापासून एकत्र जोडली जात आहेत. पण, दोघेही या रिलेशनशिपच्या चर्चांना अफवा म्हणत आहेत. नुकतेच नवीन वर्षाच्या निमित्ताने एकाच ठिकाणाहून त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. दोघांचे फोटो पहिल्यानंतर दोघेही एकत्र सुट्यांचा आनंद घेत आहेत, असा कयास चाहत्यांनी बांधला होता. ते दोघे परदेशी एकत्र फिरायला गेल्याचे म्हटले जात होते. दरम्यान, विजय आणि रश्मिका लवकरच साखरपुडा करणार असल्याच्या बातम्याही चर्चेत आल्या होत्या. आता अभिनेत्याने यावर मौन सोडले आहे.
विजयने ‘लाइफस्टाइल एशिया’ला दिलेल्या मुलाखतीत अशा बातम्यांना अफवा म्हणत फेटाळून लावले आहे. रश्मिका मंदानासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल आणि साखरपुड्याच्या चर्चेबद्दल स्पष्टीकरण देताना विजय म्हणाला की, फेब्रुवारीमध्ये त्याचा साखरपुडा किंवा लग्न या दोन्हीपैकी कहीही होणार नाही. पुढे विजय म्हणाला की, 'मला वाटते की, मी दर दोन वर्षांनी लग्न करावे, अशी मीडियाची इच्छा असावी. ही अफवा मी दरवर्षी ऐकतो. मीडिया फक्त माझ्या लग्नाची वाट पाहत आहे.'
विजय देवरकोंडाच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे की, तो इतक्यात तरी साखरपुडा किंवा लग्न करणार नाहीये. विजय देवरकोंडा सध्या चित्रपटांमध्ये खूप व्यस्त आहे. त्याचा पुढचा चित्रपट 'फॅमिली स्टार' लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये तो मृणाल ठाकूरसोबत दिसणार आहे. हा चित्रपट विजयच्या मागील सुपरहिट 'गीता गोविंदम'चा रिमेक असणार आहे. त्याचप्रमाणे हा एक कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट असणार आहे. 'फॅमिली स्टार' या चित्रपटाचे दिग्दर्शन 'गीता गोविंदम'चे दिग्दर्शक परशुराम पेटला यांनीच केले आहे. हा चित्रपट या संक्रांतीला प्रदर्शित होणार होता. पण, या दिवशी अनेक चित्रपट रिलीज होणार असल्याने तो पुढे ढकलण्यात आला.
अभिनेत्री रश्मिका मंदानाबद्दल बोलायचे तर, ती सध्या ‘अॅनिमल’च्या यशाचा आनंद घेत आहे. ‘अॅनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुराळा उडवला होता. ‘अॅनिमल’ या चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डीमरी यांच्या भूमिका आहेत. आता रश्मिका मंदाना हिचा आगामी चित्रपट 'पुष्पा २' हा १५ ऑगस्ट २०२४ रोजी रिलीज होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.