Happy Birthday Vijay Deverakonda: साऊथ सिनेसृष्टीतील स्टार अभिनेता विजय देवरकोंडा आज आपला ३४वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म ९ मे १९८९ रोजी हैदराबाद येथे झाला. अभिनयाची किंवा मनोरंजन विश्वाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना देखील विजयने आपल्या अभिनयान प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे. आजघडीला तो एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जात असेल, पण एक काळ असा होता जेव्हा त्याच्या कुटुंबातील सदस्य त्याच्यावर अभिनय सोडण्यासाठी दबाव आणत होते.
चित्रपटसृष्टीत पाय ठेवण्यापूर्वी त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. विजयने २०११मध्ये 'नुव्विला' चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्याच हा चित्रपट एक मल्टीस्टारर चित्रपट होता. यानंतर तो २०१२मध्ये 'लाईफ इज ब्यूटीफुल' चित्रपटात झळकला. मात्र, हे दोन्ही चित्रपट विजयला प्रसिद्धी मिळवून देण्यात अयशस्वी ठरले. या चित्रपटांनंतर तो दोन वर्ष घरातच होता. या दरम्यान एकही प्रोजेक्ट त्याच्या हाती आला नाही. या अंतरामुळेच कुटुंबीयांनी त्याच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली.
इतक्या वर्षांच्या गॅपमुळे घरातील सदस्यांनी अभिनय सोडण्यासाठी विजयवर दबाव आणण्यास सुरुवात केली. कॉलेजमध्ये तो चांगला हुशार विद्यार्थी होता. मात्र, चित्रपट आणि शूटिंगमुळे तो अधिकाधिक वेळ कॉलेजमध्ये जाऊच शकत नव्हता. कमी हजेरीमुळे त्याला कॉलेजला भरपूर दंडही भरवा लागला होता. पण, तो मन लावून अभ्यास करायचा आणि परीक्षेतही टॉप करायचा. त्यामुळे त्याचे कुटुंबीय वारंवार त्याच्यावर दबाव टाकायचा प्रयत्न करत होते. अभ्यासात चांगला असताना त्याला सिनेमात जायचे का? असा सवाल ते उपस्थित करत होते. मात्र, घरच्यांना शांत करण्यासाठी विजय काही ना काही प्रोजेक्ट करत असत.
या सगळ्याचाच त्याच्यावर खूप दबाव होता. त्याचे कुटुंबीय त्याच्या भविष्याबद्दल खूप गंभीर होते. मात्र, ‘येवडे सुब्रमण्यम’ हा त्याचा चित्रपट गाजल्यानंतर त्याला कुटुंबीयांनी खूप साथ दिली. २०१५मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने अभिनेत्याला चांगले यश मिळवून दिले. यामुळे त्याला त्याच्या कुटुंबाचा पाठिंबा देखील मिळाला. यानंतर विजयने ‘पेल्ली चोपुलु’ केला, जो सुपरहिट ठरला. यानंतर त्याला 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटामुळे प्रचंड यश मिळाले. या चित्रपटानंतर विजयला पुन्हा कधीच मागे वळून पाहावे लागले नाही.