Vicky Kaushal Chhaava Teaser: बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता विकी कौशल आता त्याच्य पीरियड ड्रामा चित्रपट ‘छावा’च्या रिलीजसाठी सज्ज झाला आहे. काल म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी ‘छावा’ चित्रपटाचा लक्षवेधी आणि उत्सुकता वाढवणारा टीझर प्रदर्शित झाला आहे. बॉलिवूडची स्टार अभिनेत्री आणि विकी कौशल याची पत्नी कतरिना कैफ हिने विकी कौशल आणि रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ या चित्रपटाच्या टीझरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कतरिना कैफने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘छावा’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. यासोबतच तिने या टीझरचे तोंडभरून कौतुक केले आहे.
कतरिना कैफने तिच्या इन्स्टास्टोरीवर ‘छावा’ या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. या टीझरसोबत तिने ‘रॉ, ब्रूटल, ग्लोरियस’ असे म्हणत या चित्रपटाचे कौतुक केले आहे. कतरिनाने तिच्या इन्स्टा स्टोरी पोस्टमध्ये पती विकी कौशल तसेच, ‘छावा’चे निर्माते मॅडॉक फिल्म्स, रश्मिका मंदाना, लक्ष्मण उतेकर आणि निर्माता दिनेश विजान यांनाही तिने टॅग करून, त्यांचेही कौतुक केले आहे. ‘छावा’ चित्रपटाचा टीझर पाहून कतरिना कैफ देखील भारावून गेली आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर, अभिनेत्री रश्मिका मंदाना या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई भोसले यांची भूमिका साकारणार आहे. आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि अक्षय खन्ना हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या १ मिनिट १४ सेकंदाच्या टीझरची सुरुवात विकी कौशलच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेने होते. टीझरच्या सुरुवातीला पार्श्वभूमीतून विकीचा आवाज येतो, ज्यामध्ये तो म्हणतो की, 'छत्रपती शिवाजी महाराजांना सिंह आणि सिंहाच्या मुलाला 'छावा' म्हणतात.’ यानंतर, शूर संभाजी महाराजांची कहाणी सुरू होते, जिथे सिंहासारखी गर्जना करणारा विकी एकाच वेळी समोरील सगळ्या शत्रूंवर हल्ला करतो.
विकीचा कधीही न पाहिलेला अवतार एका छोट्याशा टीझरमध्ये पाहायला मिळाला आहे. महिनाभरापूर्वी ‘तोबा तोबा’वर कूल ड्यूडसारख्या नाचणाऱ्या विकीमध्ये ‘छावा’च्या निमित्ताने एवढे जबरदस्त परिवर्तन पाहायला मिळेल, यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. त्याचा इंटेन्स लूक आणि ॲक्शन अवतार सगळ्यांनाच भुरळ घालत आहे. ‘छावा’ हा चित्रपट ६ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘पुष्पा २: द रुल’ देखील याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातही रश्मिका मंदाना मुख्य अभिनेत्री असणार आहे.