Chhaava Advance Booking : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांची ही प्रतीक्षा १४ फेब्रुवारीला संपणार आहे. चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. विकी कौशलचा हा चित्रपट चांगली कामगिरी करू शकतो, असे मानले जात आहे. आगाऊ तिकीट बुकिंग सुरू होऊन २४ तासांतच ओपनिंग डेसाठी १८ हजार तिकिटे विकली गेली आहेत. बुक माय शोनुसार, २६२ हजार लोकांनी हा चित्रपट पाहण्यात रस दाखवला आहे.
sacnilk.com ने दिलेल्या माहितीनुसार, ॲडव्हान्स बुकिंग सुरू होऊन २४ तासांपेक्षा कमी कालावधीत पहिल्या दिवसाची १८ हजार तिकिटे विकली गेली आहेत. रिपोर्टनुसार, रविवारी संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत या चित्रपटाने प्री-सेल्समध्ये १.५४ कोटी रुपये (ब्लॉक सीटसह) कमावले आहेत. विकी कौशलचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विकी कौशलने आज आपल्या इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती दिली होती की छावाचे ॲडव्हान्स बुकिंग जगभरात सुरू झाले आहे. या पोस्टमध्ये विकी कौशलने काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये विकी कौशलने छावाच्या तयारीची झलक दाखवली आहे.
बूक माय शो या तिकिट बुकींग साइटवर गेल्यास छावाच्या तिकीट दराची माहिती समजते. अनेक ठिकाणी पहिल्या मॉर्निंग शोचं तिकिट ३०० ते ३५० च्या घरात विकलं जातंय. मॉर्निंग शोचं तिकिट अनेकदा स्वस्त असतं. परंतु 'छावा'च्या पहिल्या शोचं तिकिट २०० ते ४०० च्या रेंजमध्ये आहे. इतकंच नव्हे तर PVR, INOX सारख्या थिएटर्समध्ये काही ठिकाणी हेच तिकीट ४५०-५०० रुपयांपर्यंत बघायला मिळतंय. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, विकी कौशलच्या छावाचे सर्वात महागडे तिकीट मुंबईतील मेसन पीव्हीआर : जिओ वर्ल्ड ड्राइव्ह इनमध्ये उपलब्ध आहे. येथील एका तिकिटाची किंमत २,५७० रुपये सांगितली जात आहे.
या चित्रपटात विकी कौशलसोबत रश्मिका मंदाना झळकणार आहे. विक्की कौशलच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. या चित्रपटात विकी कौशल मराठा सम्राट छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात विकी आणि रश्मिका व्यतिरिक्त अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्याही मुख्य भूमिका आहेत. विकी कौशलचा छावा हा दोन तास, ४१ मिनिटे आणि ५० सेकंदांचा चित्रपट असेल. या चित्रपटाची निर्मिती मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओने केली आहे.
संबंधित बातम्या