ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन ; मराठी कलाविश्वावर शोककळा-veteran marathi actress suhasini deshpande passed away at her residence in pune ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन ; मराठी कलाविश्वावर शोककळा

ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन ; मराठी कलाविश्वावर शोककळा

Aug 27, 2024 10:14 PM IST

suhasini Deshpande passed away : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे मंगळवारी पुण्यात राहत्या घरी निधन झालं आहे. सुहासिनी देशपांडे यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही काम केले आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन

Veteran actress suhasini Deshpande passed away : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे आज (मंगळवार) सायंकाळच्या सुमारास निधन झाले. पुण्यातील आपल्या निवासस्थानी त्यांनी अंतिम श्वास घेतला. मराठी चित्रपटांसोबतच त्यांनी बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांत काम केले आहे. २०११ मध्ये रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम' चित्रपटात त्यांनी काम केले होते. तो त्यांचा शेवटचाच हिंदी चित्रपट होता. 

सुहासिनी देशपांडे यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या आहेत.  त्यांच्या निधनाने मराठी कलासृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या दमदार अभिनय कौशल्यानं त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत सुहासिनी यांचे मोठे योगदान -
सुहासिनी देशपांडे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक चित्रपटात दमदार अभिनय करून आपली छाप सोडली. यामध्ये मानाचं कुंकू (१९८१), कथा (१९८३), आज झाले मुक्त मी (१९८६), आई शप्पथ (२००६)  आणि चिरंजीव (२०१६)  आदि चित्रपटांचा समावेश आहे. त्याचबरोबर २०१७ मध्ये प्रदर्शित झालेली मोनीश पवार दिग्दर्शित 'ढोंडी' मध्येही दिसल्या होत्या. 

वारसा लक्ष्मीचा, काळूबाईच्या नावानं चांगभलं, देवकीनंदन गोपाला, पुढचं पाऊल, धग, माहेरचा आहेर, गड जेजुरी, आम्ही दोघे राजा राणी, बाईसाहेब, हे त्यांचे आणखी काही गाजलेले चित्रपट आहेत. त्याचबरोबर तुझं आहे तुझ्या पाशी, बेल भंडार, कथा अकलेच्या कांद्याची, सुनबाई घर तुझंच आहे, राजकारण गेलं चुलीत, चिरंजीव आईस, सासूबाईंचं असंच असतं, लग्नाची बेडी अशा नाटकांत त्यांनी काम केले आहे. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे रंगभूमीसाठी दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल सुहासिनी देशपांडे यांना २०१५ मध्ये जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 

बुधवारी अंतिम संस्कार -

सुहासिनी देशपांडे यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर बुधवारी ( २८ ऑगस्ट) पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

वयाच्या १२ व्या वर्षापासून अभिनय क्षेत्रात –

रिपोर्ट्सनुसार सुहासिनी देशपांडे यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात वयाच्या १२ व्या वर्षापासून केली होती. मागील ७० वर्षाच्या काळात त्यांनी १०० हून अधिक चित्रपटात दमदार भूमिका साकरल्या आहेत.