Pritish Nandy Death News : प्रसिद्ध कवी, लेखक, चित्रपट निर्माते आणि पत्रकार प्रीतीश नंदी यांचे आज ८ जानेवारी २०२५ रोजी मुंबईत निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूड आणि साहित्य विश्वात शोककळा पसरली आहे. प्रीतीश नंदी यांनी आपल्या कारकिर्दीत करीना कपूरचा 'चमेली', 'हजारों ख्वाहिशें ऐसी', 'प्यार के साइड इफेक्ट्स' यांसह अनेक नेत्रदीपक चित्रपट केले. अभिनेता अनुपम खेर यांनी प्रीतीश नंदी यांच्या निधनावर शोक व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे.
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी लिहिले की, "माझे प्रिय मित्र प्रीतीश नंदी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दु:ख झाले. ते एक महान कवी, लेखक, चित्रपट निर्माते आणि पत्रकार होते. सुरुवातीच्या काळात मुंबईत तेच माझा आधार आणि शक्तीस्त्रोत होते. आमच्यात बरेच साम्य होते. मला भेटलेल्या सर्वात निर्भीड व्यक्तींपैकी ते एक होते. ते नेहमी आयुष्यापेक्षा मोठे असत. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. अलीकडे आम्ही अनेकदा भेटत नव्हतो, पण एक काळ असा होता जेव्हा आम्ही एकत्र राहत होतो! जेव्हा त्यांनी मला फिल्मफेअर आणि 'द इलस्ट्रेटेड वीकली'च्या कव्हरवर आणले होते ते मी कधीच विसरू शकणार नाही. तो खऱ्या अर्थाने 'यारों के यार' होते! मला तुझी आणि आपल्या एकत्र घालवलेल्या वेळेची आठवण येईल, मित्रा. तुझ्या आत्म्याला चिर:शांती लाभो.'
प्रीतीश नंदी यांचा जन्म १५ जानेवारी १९५१ रोजी बिहारमधील भागलपूर येथे झाला होता. कोलकात्याच्या ला मार्टिनियर कॉलेजमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी भारतीय साहित्य, पत्रकारिता, चित्रपट निर्मिती आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात आपला ठसा उमटवला. प्रीतीश हे निडर पत्रकार असल्याचे बोलले जाते. १९८० च्या दशकात प्रीतीश नंदी हे टाइम्स ऑफ इंडिया समूहाचे प्रकाशन संचालक, 'द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया', 'द इंडिपेंडंट' आणि 'फिल्मफेअर' मासिकांचे संपादक आणि प्रकाशक होते. त्यांनी १९९३ मध्ये प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्सची स्थापना केली, जी चित्रपट निर्मिती, टेलिव्हिजन शो आणि डिजिटल सामग्रीसाठी ओळखली जाते. प्रीतीशने आपल्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत 'चमेली', 'हजारों ख्वाहिशें ऐसी' यांसारख्या चित्रपटांसह अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली. त्यांच्या कंपनीचा डिजिटल शो 'फोर मोर शॉट्स प्लीज! देखील यात सामील आहे.
संबंधित बातम्या