Shiv kumar Khurana Death: सत्तर-ऐंशीच्या दशकात हिंदी सिनेसृष्टीत सक्रिय असलेले व अभिनेते विनोद खन्ना यांना बॉलिवूडमध्ये ब्रेक देणारे निर्माते-दिग्दर्शक शिवकुमार खुराना यांचं निधन झालं आहे. ते ८३ वर्षांचे होते. वयपरत्वे आजारांनी ग्रस्त असलेल्या खुराना यांच्यावर ब्रह्मकुमारी ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शिवकुमार खुराना यांच्या निधनाबद्दल सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. सेलिब्रिटींबरोबरच चित्रपटरसिकही त्यांच्याविषयी भरभरून लिहित आहेत. अभिनेते विंदू दारा सिंह यांनीही ट्विट करत शिवकुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हिंदीत सिनेसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणारे अभिनेते विनोद खन्ना यांना शिवकुमार खुराना यांनीच आपल्या चित्रपटातून पहिला ब्रेक दिला होता. विंदू दारा सिंग यांनीही शिवकुमारच्या यांच्याच चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.
चित्रपटांची यादी मोठी
शिवकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांची यादी मोठी आहे. 'मिट्टी और सोना', 'फर्स्ट लव्ह लेटर', 'बदनाम', 'जालसाज', 'बेआबारू', 'सोने की जंजीर', 'बदनसीब', 'बेगुनाह' आणि 'इंतकाम की आग' सारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. त्यांच्या दिग्दर्शनाचं त्या काळी खूप कौतुक झालं होतं. चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. 'दगाबाज', 'हम तुम और वो', 'अंग से अंग लगाए' यांसारख्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती. मुंबईतील गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा इथं आज मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.