देशभरात पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा आज पार पडत आहे. पाचव्या टप्प्यात आज मुंबईत मतदान पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेल्या मतदानाला मुंबईकर भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहे. बॉलिवूड आणि मराठी कलाकारांनी देखील आपला मतदानाचा अधिकार बजावत आपल्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. अगदी ज्येष्ठ कलाकारांनी देखील आपल्या जवळच्या बूथवर जाऊन आपलं मत दिलं आहे. मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्री शुभा खोटे यांनी देखील नुकतंच मतदान केलं. मतदान करून बाहेर पडल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद देखील साधला.
वय वर्ष ८६ असणाऱ्या शुभा खोटे यांनी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी आपलं बहुमूल्य मत का द्यावं आणि यामुळे आपल्या देशाचा आणि आपला कसा विकास होणार यावर भाष्य केलं. मत देऊन बाहेर आल्यानंतर शुभा खोटे म्हणाल्या की, ‘आता उरलेसुरले दिवस सुखात जावेत म्हणजे झालं अशाच उमेदवाराला मी मत देऊन आले. मी योग्य उमेदवाराला मत दिलंय आणि आता आशा आहे की, आयुष्याचे उरलीसुरली वर्ष शांततेत आणि सुखात जातील. बस... आणखी काही नको... नागरिकांसाठी जे आवश्यक आहे ते प्रत्येकाला मिळणं हेच महत्त्वाचे आहे’, असं शुभा खोटे म्हणाल्या.
मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस असा मानून अनेक लोक मत देणं टाळतात. अशा लोकांना उद्देशून शुभा खोटे म्हणाल्या की, ‘मी मत देण्यासाठी घराबाहेर पडले आहे. कुणालाही घरी बोलावून मी माझं मत दिलेलं नाही. माझ्याकडे बघून लोकांनी प्रेरणा घ्यावी आणि घरातून बाहेर पडून आपल्या जवळच्या मतदान केंद्रात जाऊन आपलं बहुमूल्य मत द्यावं, अशी मी सगळ्यांना विनंती करेन.’
ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या वतीने घरबसल्या मत देण्याची सुविधा प्रदान करण्यात येते. मात्र, ८६ वर्षांच्या शुभा खोटे यांनी ही सेवा न घेता, घरातून बाहेर पडून आपल्या जवळच्या मतदान केंद्रात जाऊन आपलं बहुमूल्य मत योग्य उमेदवाराला दिलं आहे. वयाच्या या टप्प्यावर देखील त्यांचा उत्साह पाहून चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. त्यांच्याकडे पाहूनच तरुण पिढीने देखील मतदान करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असं प्रत्येकालाच वाटत आहे.