Veer Zaara Re Release : बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान आणि ‘डिम्पल गर्ल’ प्रिती झिंटा स्टारर चित्रपट 'वीर जारा' हा चित्रपट २० वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक यश चोप्रा यांचा जागतिक स्तरावर ब्लॉकबस्टर झालेला ‘वीर जारा’ हा चित्रपट आजपासून म्हणजेच ७ नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर ६०० स्क्रीन्सवर पुन्हा रिलीज होणार आहे. सौदी अरेबियामध्ये पहिल्यांदाच या चित्रपटाचा प्रीमियरही होणार आहे. यानंतर त्याचे शो ओमान आणि कतारमध्येही चालतील.
शाहरुख खान, प्रिती झिंटा आणि राणी मुखर्जी अभिनीत ‘वीर जारा’ हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हिट भारतीय चित्रपट आहे. हा चित्रपट भारतात, परदेशात तसेच जगभरात सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला होता. आता वीर झारा यूएसए, कॅनडा, यूएई, सौदी अरेबिया, ओमान, कतार, बहरीन, कुवेत, यूके, आयर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रिया, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजीमध्ये पुन्हा प्रदर्शित होईल. यासोबतच सिंगापूर, मलेशिया आणि दक्षिण आफ्रिकेतही याचे शो चालणार आहेत.
शाहरुख खान स्टारर हा चित्रपट १२ नोव्हेंबर २००४ रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाला १२ तारखेला २० वर्षे पूर्ण होत आहेत. या खास निमित्ताने हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. २३ कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने भारतात त्यावेळी ६० कोटींची कमाई केली होती. याशिवाय चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनने ९७ कोटींचा आकडा पार केला होता. हा चित्रपट त्याच्या काळातील सर्वात सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. शाहरुख खान आणि प्रिती झिंटासोबतच राणी मुखर्जी आणि मनोज बाजपेयीही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.
चित्रपटाच्या या २० वर्षांनंतर रिलीज होणाऱ्या या व्हर्जनमध्ये 'ये हम आ गए हैं कहाँ' हे गाणेही पहिल्यांदाच दाखवण्यात येणार आहे. आधी हे गाणे चित्रपटातून हटवण्यात आले होते. हे गाणे पहिल्यांदाच चित्रपटाचा भाग असणार आहे. शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी ही एक मेजवानी असणार आहे. प्रेक्षकांना हे प्रेमगीत पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘वीर जारा’ पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.