बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा 'वेदा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जॉन अब्राहम मोठ्या पडद्यावर दमदार अॅक्शन करताना दिसणार आहे. सध्या जॉन त्याच्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्यात जॉन चिडला होता. नेमकं असं काय झालं की जॉन चिडला असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
जॉनने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ट्रेलर लाँच सोहळ्यात तो का चिडला होता यामागचे कारण सांगितले आहे. जॉन म्हणाला, 'त्या व्यक्तीने मला मुद्दाम डिवचले. मला माहिती आहे त्या व्यक्तीने इवेंटमध्ये मुद्दाम चिडवणे, मला विरोध करणे आणि मला राग यावा म्हणून त्याला तेथे बसवण्यात आले होते. मी स्पष्ट सांगतो की ती व्यक्ती जिंकली आणि मी हारलो. कारण मला खूप राग आला होता.'
मुलाखतीमध्ये जॉन अब्राहमने अशा कार्यक्रमांना जाऊन आनंद मिळत नसल्याची कबुली दिली. 'मला ट्रेलर लाँच आवडत नाही, कारण तुम्ही २० वर्षांपूर्वीच्या काळाकडे वळता. तेच पत्रकार, तेच हास्यास्पद प्रश्न, कोणीही योग्य प्रश्न विचारत नाही' असे जॉन म्हणाला. जॉन पुढे म्हणाला की, 'माझ्या मते भारतातील मनोरंजन क्षेत्रातील पत्रकारिता संपली आहे.'
वाचा: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या साखरपुड्यानंतर सामंथा रुथ प्रभूने केली पहिली पोस्ट, म्हणाली...
चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये जॉन अब्राहम पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देत असताना एका पत्रकाराने वेद चित्रपटाचे वर्णन रिपीट कंटेंट आहे असे का म्हटले जात आहे असा प्रश्न विचारला होता. हा प्रश्न ऐकून जॉनला राग अनावर झाला होता. तो पत्रकाराला म्हणाला, 'मी तुम्हाला मूर्ख म्हणू शकतो का? आधी चित्रपट पाहा आणि मग त्यावरुन जज करा'.
जॉन अब्राहमचा ‘वेदा’ हा अॅक्शन थ्रिलर १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल अडवाणीने केले आहे. तसेच चित्रपटात जॉन अब्राहमसोबत शर्वरी वाघ, तमन्ना भाटिया, अभिषेक बॅनर्जी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली.