बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल यांच्या पोटी एका छोट्या परीचा जन्म झाला आहे. काल संध्याकाळी या जोडप्याने त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले. ही आनंदाची बातमी वरुण धवनचे वडील आणि प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांची सून नताशा हिने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला आहे. त्यांच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे. वरुण आणि नताशाने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रेग्नेंसीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. नताशाच्या बेबी बंपसोबतचा एक फोटो शेअर करताना अभिनेत्याने सांगितले होते की, तो लवकरच पिता होणार आहे. आता अखेर हा आनंदाचा टप्पा त्याच्या आयुष्यात आला आहे.
अभिनेता वरुण धवनचा एक व्हिडीओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये अभिनेता मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलबाहेर स्पॉट झाला होता. यावेळी अभिनेत्याच्या हातात लाल रंगाची पिशवीही होती. व्हिडीओमध्ये अभिनेता त्याच्या कारमध्ये बसलेला दिसत होता. त्याला हॉस्पिटलबाहेर पाहिल्यानंतर अभिनेता पत्नी नताशासोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याची चर्चा सुरू झाली. याच दिवशी संध्याकाळपर्यंत या जोडप्याने त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नताशा दलालला ३ जून रोजी प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यानंतर लगेचच वरुण धवनने सर्व काम सोडून पत्नीला रुग्णालयात नेले. तेव्हापासून चाहते अभिनेत्याकडून आनंदाची बातमी ऐकण्यासाठी उत्सुक होते. आता हे बॉलिवूडचे क्युट जोडपे एका चिमुकलीचे पालक बनले आहेत. त्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून वरुण आणि नताशाचे भरभरून अभिनंदन करत आहे.
वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी २०२१मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या तिसऱ्या वर्षी या जोडप्याने त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले. वरुण धवनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता सध्या त्याच्या आगामी 'बेबी जान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यांची पत्नी नताशा दलाल व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे. वरुण आणि नताशा हे बालपणीचे मित्र आहेत. त्यांच्या मैत्रीचे नंतर प्रेमात रुपांतर झाले. २०२१मध्ये दोघेही पती-पत्नी झाले होते.