Citadel Honey Bunny Review In Marathi : बहुचर्चित स्पाय थ्रिलर वेब सीरिज ‘सिटाडेल हनी बनी’ आजपासून ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओवर रिलीज करण्यात आली आहे. वरुण धवन आणि समंथा रुथ प्रभू यांच्या या सीरिजबद्दल चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. स्पाय थ्रिलर हा सिनेमाचा एक प्रकार आहे. ‘सिटाडेल’ ही याच प्रकारातील एक सीरिज आहे. या सीरिजचे वेगवेगळे व्हर्जन्स आले आहेत. या दरम्यानच आता ‘सिटाडेल’चे हिंदी व्हर्जन भारतीय प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या सीरिजमध्ये जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळाली होती.
आता ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओवर रिलीज होणाऱ्या ‘सिटाडेल हनी बनी’ या स्पाय थ्रिलर वेब सीरिजमध्ये असेच काहीसे पाहायला मिळत आहे. जर, या वीकेंडला तुम्ही देखील वरुण धवन आणि समंथा रुथ प्रभू यांची ही सीरिज पाहण्याचा विचार करत असाल, तर हा रिव्ह्यू वाचाच...
‘सिटाडेल हनी बनी’ ही सीरिज अमेरिकेतील प्रसिद्ध दिग्दर्शक रुसो ब्रदर्सच्या गुप्तहेर वेब सीरिज ‘सिटाडेल’चे हिंदी रूपांतर आहे. या ६ भागांच्या सीरिजची कथा एका स्ट्रगल करणारी अभिनेत्री हनी (समंथा रुथ प्रभू) आणि तिची मुलगी नादिया (काशवी मजुमदार) यांच्याभोवती फिरते, ज्यांचा काही गुंड पाठलाग करत असतात. १९९२ आणि २०००च्या कालखंडावर आधारित कथेचा आशय पुढे नेण्यात आला आहे. कथेत पुढे चित्रपटांमध्ये स्टंटमॅन म्हणून काम करणाऱ्या राहीची (वरुण धवन) एंट्रीही झाली आहे.
हनी आणि राही कसे भेटतात आणि मग एका गुप्तचर तपास संस्थेसाठी काम करायला सुरुवात करतात, हे तुम्हाला सीरिज पाहताना कळेल. पण, आता ते नक्की कोणत्या देशाच्या गुप्तहेर संघटनेचा भाग आहेत, हे मात्र तुम्हालाच शोधावे लागेल. त्यांच्या या टीमचे नेतृत्व बाबा (केके मेनन) करतात. ही टीम दुसऱ्या गुप्तचर संस्थेशी (सिटाडेल) स्पर्धा करते. या सीरिजच्या संपूर्ण कथेमध्ये एका महत्त्वाच्या उपकरणासाठी या दोन गुप्तचर संस्थांमधील संघर्षाचे चित्रण करण्यात आले आहे. मात्र, ही सीरिज पाहताना असे वाटते की, या कथेत गुप्तहेरसारखे काहीही दिसत नाही.
हिंदीमध्ये राज आणि डीके या जोडीने ‘सिटाडेल हनी बनी’ ही सीरिज तयार केली आहे. पण, यावेळी त्यांची जादू फारशी चालताना दिसत नाहीय. याआधी या दोघांनी ‘द फॅमिली मॅन’ आणि ‘गन्स अँड गुलाब’ यांसारख्या अनेक वेब सीरिजमधून चाहत्यांची मने जिंकली आहेत. पण ‘सिटाडेल हनी बनी’च्या बाबतीत त्यांनी चूक केली आहे. दिग्दर्शनाचे काम चांगले आहे, मात्र या दरम्यानची कथा तुम्हाला स्वतःला शोधात राहावी लागेल. या सीरिजमध्ये सिनेमॅटोग्राफीचा उत्तम वापर करण्यात आला आहे.
या ‘सिटाडेल हनी बनी’ सीरिजमध्ये वरुण धवन आणि समंथा रुथ प्रभू यांनी ज्याप्रकारे त्यांच्या पात्रांमध्ये प्राण फुंकले आहेत, त्यासाठी त्यांचे कौतुक करायलाच हवे. इतकंच नाही तर, दोघेही ॲक्शन सीक्वेन्समध्ये उत्कृष्ट दिसले आहेत. मात्र, या बाबतीत अॅक्शनच्या बाबतीत समंथा वरुणपेक्षा खूप पुढे असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय साकिब सलीम (केडी) नकारात्मक भूमिकेत प्रभावी दिसला आहे. दुसरीकडे, शिव अंकित सिंह परिहार (चोको), सोहम मजुमदार (लुडो), सिकंदर खेर (शान) यांनीही आपापल्या पात्रांना न्याय दिला आहे.
वेब सीरिज : सिटाडेल हनी बनी
दिग्दर्शक : राज निदिमोरु, कृष्णा डीके, रुसो ब्रदर्स
कलाकार : वरुण धवन, समांथा रुथ प्रभू, केके मेनन, साकिब सलीम, सिकंदर खेर
कुठे बघाल? : ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ