Vanita Kharat Birthday Post : आपल्या दमदार अभिनयाने आणि भन्नाट विनोदांनी केवळ मराठीतच नव्हे, तर हिंदी चित्रपट सृष्टीतही आपला दबदबा निर्माण करणारी अभिनेत्री वनिता खरात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वनिता खरात हिने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. यावर्षी तिने स्वतःचा वाढदिवस चक्क तीन वेगवेगळ्या देशांत एकाच वेळी साजरा केला आहे. याची खास झलक तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. यावेळी तिने सगळ्यांचे आभार देखील मानले आहेत. वनिता खरात हिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
अभिनेत्री वनिता खरात हिने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘या वर्षीचा माझा वाढदिवस खूप विशेष होता, कारण दीड दिवस माझा वाढदिवस साजरा झाला तोही ३ देशांमध्ये... अमेरिका, कॅनडा आणि भारत... तोही माझ्या लाडक्या माणसांबरोबर! इतक्या जल्लोषात आणि उत्साहात, इतक्या वेगवेगळ्या गोष्टी बघत माझा वाढदिवस साजरा होईल असं खरंच वाटलं नव्हतं. प्रेक्षकांच्या प्रेमाची ताकद मला आज इथवर घेऊन आली, आणि माझ्या मित्रांनी या वाटेवर माझी सोबत केली. घरच्यांच्या शुभाशीर्वादाने मला मार्ग दाखवला आणि नाजूक क्षणात सुमितने माझा हात धरला! इतके प्रचंड देश पाहताना, तिथल्या सौंदर्याने भारावून जाताना आणि प्रत्येक केक कापताना, सुमितची मात्र प्रचंड आठवण आली. मी तिथे असताना भारतात वाढदिवस साजरा करण्याची धुरा सुमितने सांभाळली, आणि शुभेच्छा ही माझ्यापर्यंत पोहचवल्या. या वाढदिवसानिमित्त स्वतःसाठी काही गोष्टी ठरवल्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. मिळणार प्रेम द्विगुणित करण्याचा प्रयत्न करेन. जितकं हसवते आहे, तितकंच मीही हसत राहण्याचा प्रयत्न करेन, सोबत तुम्ही असालच ही आशा बाळगून. ता. क. - पुढच्या वाढदिवसाला बघुया कुठल्या देशात असेन!’
यावेळी वनिताने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सहकलाकारांसोबत लास वेगासमध्ये धमाल करताना दिसली आहे. तर, काहींमध्ये ती वाढदिवसाचा केक कापतानाही दिसली आहे. ‘न्यूड’ फोटोशूट करून चर्चेत आलेली अभिनेत्री वनिता खरात अभिनेता शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटात देखील झळकली होती.