Vandana Gupte Ganeshotsav Special Song: गणेशोत्सवाच्या हंगामात बाप्पाला समर्पित अनेक गीते आपल्या कानावर येतात. या वर्षीचा हा उत्सव आणखी खास करणारे एक नवे गाणं म्हणजे श्रोत्यांच्या भेटीला आले आहे. वंदना गुप्ते आणि उत्तरा केळकर यांचे ‘पार्वती नंदना’ हे गणपती स्पेशल गाणे चर्चेत आहे. या गाण्यातून आजी आणि नातवाची बाप्पावरील प्रेमाची अद्वितीय भक्ती पाहायला मिळाली आहे. आपल्या अभिनयाने मराठी मनोरंजन विश्वात एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री वंदना गुप्ते आणि आपल्या सुमधुर आवाजातून लाखो मनांना भुरळ घालणाऱ्या गायिका उत्तरा केळकर यांची ही जोडी या गाण्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आली आहे. त्यांचे ‘पार्वती नंदना’ हे गाणं प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवण्यात यशस्वी ठरलं आहे.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा लाडका सण. या सणाला आणखी रंगतदार बनवण्यासाठी अनेक कलाकार आपापल्या कलेतून योगदान देतात. या वर्षी वंदना गुप्ते आणि उत्तरा केळकर यांनी ही खास भेट श्रोत्यांना दिली आहे. त्यांच्या या गाण्यात आजी आणि नातवाचे भावनिक नाते, गणपतीबाप्पाची भक्ति आणि सणांच्या आनंदाचे अद्भुत मिश्रण पाहायला मिळाले आहे. गाण्यातील शब्दांची रचना कौतुक शिरोडकर यांनी केली असून, उत्तरा केळकर आणि बालगायक आदित्य जी नायर यांनी या गाण्याला आपला सुमधुर आवाज दिला आहे. प्रवीण कुंवर यांचे संगीत या गाण्याला अधिकच खोलवर नेण्याचे काम करते.
या गाण्याची खासियत म्हणजे ते फक्त एक गाणं नाही, तर एक भावनिक प्रवास आहे. आजी आणि नातू यांच्यातील प्रेम, एकमेकांसाठी असलेली काळजी आणि गणपतीबाप्पाची भक्ती या सर्व गोष्टी या गाण्यातून उलगडतात. वंदना गुप्ते यांनी या गाण्यातून एका आजीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर, उत्तरा केळकर यांनी आपल्या मधुर आवाजात या भावनांना शब्द दिले आहेत.
वंदना गुप्ते यांनी या गाण्याबद्दल बोलताना सांगितले की, ‘पिढी मागोमाग पिढी बदलत जाते, काळ पुढे सरकत जातो. पण, आपण अनुभवलेल्या एक एक गोष्टी पुढच्या पिढीच्या पदरात टाकताना अनुभवाचे गाठोडे अलगद सोडवावे लागते. तरच त्या अनुभवाचा गोडवा पुढच्या पिढीला चाखता येतो. गणपती उत्सवाच्या याच आनंददायी सोहळ्याचं महत्त्व आपल्या नातवाला गाण्यातून समजावणारी आजी या गाण्यात दिसली आहे.’
गायिका उत्तरा केळकर यांनी या गाण्याला स्वर देऊन त्याला अधिकच भावपूर्ण बनवले आहे. त्या म्हणतात, ‘कलेची आराधना ही गणपतीची आराधना केल्यासारखी असते, त्यमुळे एक छान गाणे गायला मिळाल्याचा आनंद आहे.’