Valentines Day 2024 Kushal Badrike: व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आज प्रत्येक जण आपल्या प्रिय व्यक्तीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या विनोदवीर कुशल बद्रिके याने देखील आपल्या पत्नीसाठी खास पोस्ट लिहित प्रेमाचा वर्षाव केला आहे. कुशल बद्रिकेची हिच पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकदा कुशल बद्रिके सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या पत्नीचं कौतुक करताना दिसतो. आता देखील त्याने पत्नीसाठी खास ‘व्हॅलेंटाईन’ स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता कुशल बद्रिके याने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिलेय की, ‘तुमच्या सोबत झालंय का कधी असं? की एखादं माणूस आपल्या समोर येतं आणि जगात फक्त आपलंच घड्याळ स्लो मोशनमध्ये धावायला लागतं. न्यूटनने लावलेला गुरुत्वाकर्षणाचा शोध फाट्यावर मारून आपण तरंगूच लागतो एकदम. जत्रेतल्या चष्मेवाल्याकडचा “गुलाबी गॉगल” चढवल्या सारखं फक्त आपलंच जग “गुलाबी” होऊन जातं आणि “जत्रेतला पाळणा” अजूनही स्लो मोशनमध्ये धावत आपल्या घड्याळात अडकून पडलेला असतो, बास बास तुमचा व्यवहारी जगाशी संबंध संपला, राजाहो तुम्ही प्रेमात आहात, आता स्लो मोशनमधलं “जत्रेतलं घड्याळ” आणि तुमच्या “मनगटावरचा पाळणा” नॉर्मलला आणायची चावी समोरच्या माणसाकडे आहे. देव तुमचं भलं करो.’
कुशलने या पोस्टसोबत पत्नी सुनैना हिच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुनैना कुशलकडे प्रमाने बघताना दिसत आहे. कुशल बद्रिके याच्या या पोस्टवर आता चाहत्यांसह अनेक कलाकार देखील कमेंट्स करत आहेत. अभिनेता संतोष जुवेकर यांनी कमेंट करत म्हटले की, ‘प्रेम दिनाच्या प्रेमपूर्वक प्रेमळ खूप खूप प्रेम तुम्हां दोघांनाही’. तर आणखी काही कलाकारांच्या अशाच काही कमेंट्स पाहायला मिळत आहेत. तर, चाहते देखील यावर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. काही चाहत्यांनी कुशलच्या या पोस्टवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
‘सुंदर फोटो’, ‘सुंदर जोडी’, ‘दादा हे बरोबर नाही वहिनीचा ब्लर फोटो आणि तुझा क्लीअर कट..’, ‘सुकून वाले कुशल दादा... दिग्दर्शक पणा आता कलाकार पेक्षा उठून दिसत आहे... लव यू कुशल दादा...’, ‘कुशल दादा आता कादंबरी लिहायला हरकत नाही’, ‘वहिनी आता तुझ्याकडेच बघणार आहे’, अशा कमेंट्स कुशल बद्रिके याच्या या पोस्टवर चाहत्यांनी केल्या आहेत.
संबंधित बातम्या