Vaibhavi Upadhyaya: नेमका कसा झाला वैभवी उपाध्यायचा अपघात? पोलीस म्हणतात ‘सीटबेल्ट न लावता...’
Vaibhavi Upadhyaya Accident Update: वैभवी तिच्या होणाऱ्या पतीसोबत त्यांच्या फॉर्च्युनर कारमधून हिमाचल प्रदेशातील तीर्थन व्हॅलीला फिरायला चालली होती. त्याचवेळी हा अपघात घडला आहे.
Vaibhavi Upadhyaya Accident Update: 'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचा २३ मे रोजी अपघाती मृत्यू झाला. कमी वयातच जगाचा निरोप घेतल्याने तिच्या कुटुंबीयांमध्ये आणि मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. वैभवी तिच्या होणाऱ्या पतीसोबत त्यांच्या फॉर्च्युनर कारमधून हिमाचल प्रदेशातील तीर्थन व्हॅलीला फिरायला चालली होती. त्याचवेळी बंजारजवळील सिधवा येथे त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळले आणि वैभवीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती आता पोलिसांनी देखील दिली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
आता या अपघातात काही नवीन गोष्टी समोर येत आहेत. कुल्लूच्या एसपी साक्षी वर्मा यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, वैभवी शेवटच्या क्षणापर्यंत कारच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. परंतु, या प्रयत्नात तिला अपयश आले. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. एसपींनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘वैभवीला कारच्या खिडकीतून बाहेर पडायचे होते. परंतु, तिच्या डोक्याला जबरदस्त दुखापत झाली, जी तिच्यासाठी जीवघेणी ठरली आहे.’ या अपघातानंतर तिला तातडीने बंजार येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
त्यांची कार भरधाव वेगात चालवली जात होती, त्यामुळेच हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या अपघातात वैभवीचा मृत्यू झाला. मात्र, तिचा होणारा पती जय सुरेश गांधी याचा जीव वाचला. त्याला फक्त किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्याच्या दोन्ही हातांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, वैभवी दरीकडच्या बाजूला बसल्याने तिला गंभीर दुखापत झाली होती. दुर्दैवाने तिने सीट बेल्ट देखील घातला नव्हता. यातच तिच्या डोक्याला मार लागला आणि नंतर तिला हृदयविकाराचा झटका आला. काही वेळातच बरेच लोक जमले आणि त्यांना बाहेर काढण्यात आले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.