Happy Birthday Vaani Kapoor: वाणी कपूर, एक सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री, आज (२३ ऑगस्ट) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. 'वॉर', 'बेल बॉटम', 'बेफिक्रे' यांसारख्या चित्रपटांमधून तिने आपली अभिनय क्षमता सिद्ध केली आहे. वाणी कपूरने २०१३मध्ये 'शुद्ध देसी रोमान्स' या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते, ज्यामध्ये तिच्यासोबत सुशांत सिंह राजपूत दिसला होता. या चित्रपटात वाणीने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली. वाणी कपूरची कोणतीही चित्रपट पार्श्वभूमी नाही किंवा तिने कधीही थिएटर केले नाही. अभिनयात येण्याआधी ती हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करायची. पण, तिच्या नशिबाने असे वळण घेतले की, ती बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामील आहे. तिच्या बॉलिवूड एन्ट्रीची कथा देखील खूप रंजक आहे.
वाणी कपूरचा जन्म दिल्लीत झाला. तिच्या वडिलांचे नाव शिव कपूर असून, ते व्यवसायाने फर्निचर निर्यातदार आहेत. तर, तिची आई शिक्षिका होती. वाणी कपूरचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीच्या माता जयकौर पब्लिक स्कूलमधून झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तिने इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला. इथून तिने पर्यटन विषयात बॅचलर डिग्री मिळवली आणि जयपूरच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये इंटर्नशिप केली. यानंतर ती आयटीसी हॉटेलमध्ये काम करू लागला. इथूनच तिच्यात चित्रपटांमध्ये काम करण्याची आवड निर्माण झाली.
वाणी ज्या हॉटेलमध्ये काम करत होती, तिथे एकदा चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. यावेळी वाणीही तिथे उपस्थित होती. त्यानंतर चित्रपटाचे शूटिंग पाहिल्यानंतर वाणीनेही फिल्मी दुनियेत येण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने हॉटेलची नोकरी सोडून, मॉडेलिंगच्या दुनियेत प्रवेश केला. वाणीचे वडील तिच्या या निर्णयावर खूश नव्हते. मात्र, तिच्या आईने अभिनेत्रीच्या या निर्णयाचे पूर्ण समर्थन केले. यानंतर अभिनेत्रीने अनेक मोठ्या डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केले.
मॉडेलिंगच्या दुनियेत प्रवेश करताच वाणीने चित्रपटांमध्ये प्रवेश केला. २००९मध्ये तिने 'स्पेशल ॲट १०' मधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. यावेळी तिने चित्रपटांसाठी संघर्ष सुरूच ठेवला. वाणीच्या मेहनतीला लवकरच फळ मिळाले आणि दिग्दर्शक यश राजने तिला 'शुद्ध देसी रोमान्स' चित्रपटासाठी संपर्क केला. वाणीने यशराजसोबत तीन चित्रपटांसाठी करार केला होता. या चित्रपटात ती सहाय्यक भूमिकेत होती. परंतु, तिने आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले आणि सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा किताब पटकावला.
वाणीने तिच्या १० वर्षांच्या बॉलिवूड करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासोबतच वाणी मॉडेलिंगच्या जगातही खूप सक्रिय आहे. चित्रपटांसोबतच ती मॉडेलिंग, फोटोशूट आणि जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करते. ती अनेकदा प्रसिद्ध फॅशन डिझायनर्ससाठी रॅम्पवर चालते. अनेक टेलिव्हिजन जाहिरातींमध्येही ती दिसते. याशिवाय ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.