मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vaalvi: 'वाळवी' सिनेमा जर इतका चांगला आहे, तर एकावर एक ऑफर का दिल्या जातायत? जाणकारांमध्ये चर्चा

Vaalvi: 'वाळवी' सिनेमा जर इतका चांगला आहे, तर एकावर एक ऑफर का दिल्या जातायत? जाणकारांमध्ये चर्चा

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 23, 2023 10:26 PM IST

Vaalvi Marathi Movie: ‘वाळवी’ चित्रपटाचं कौतुक होत असताना देखील याच्या तिकीटावर सतत काहीना काही ऑफर दिल्या जात आहेत. आज देखील हा चित्रपट अवघ्या ११२ रुपयांमध्ये पाहायला मिळणार आहे.

Vaalvi
Vaalvi

Vaalvi Marathi Movie: मराठी मनोरंजन विश्वात सध्या ‘वाळवी’ या चित्रपटाचा बोलबाला आहे. काही ठिकाणी या चित्रपटाला हाऊसफुल प्रतिसाद मिळत आहे. जिथे तिथे सध्या ‘वाळवी’ची चर्चा पहायाला मिळत आहे. इतकी चर्चा सुरू असताना आणि चित्रपटाचं कौतुक होत असताना देखील अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे. चित्रपट इतका चर्चेत असताना देखील याच्या तिकीटावर सतत काहीना काही ऑफर दिल्या जात आहेत. या ऑफर देखील चित्रपट चर्चेत येण्यास कारणीभूत ठरल्या आहेत.

चित्रपटाच्या तिकीटावर ऑफर देणं हा चित्रपटाच्या प्रमोशनचा हटके फंडा आहे. मात्र, या चित्रपटाच्या निमित्ताने अगदी रोजच काहीना काही ऑफर्स पाहायला मिळत आहेत. कधी एकवर एक तिकीट फ्री, ९९ रुपयांत तिकीट तर कधी अवघ्या ११२ रुपयांत तिकीट अशा अनेक ऑफर या चित्रपटावर पाहायला मिळत आहे. या ऑफर्समुळे अनेकांची पावलं थिएटरकडे वळताना दिसत आहेत. ‘वाळवी’ या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला आहे.

काही जाणकारांच्या मतानुसार, प्रेक्षकांना थिएटरकडे वळवण्यासाठी अशा काही ऑफर देणं फायदेशीर ठरतं. प्रेक्षकाला एखादी ऑफर मिळाली की, त्या निमित्ताने गोष्ट सहज केली जाते. म्हणजेच एखाद्या वस्तूवर जर ऑफर दिली जात असेल, तर ती वस्तू अगदी गरज नसतानाही खरेदी केली जाते. हाच नियम इथे देखील लागू पडतो. अनेकांना चित्रपट पाहायचा असतो. मात्र, थिएटरमध्ये न जाण्यासाठी अनेक कारणं असतात. कधी वेळ, तर कंटाळा... मात्र, अशा ऑफर्स दिल्या की, त्या निमित्ताने प्रेक्षक चित्रपट आवर्जून पाहतात.

काहींच्या मते, ‘वाळवी’ या चित्रपटाची कथा अतिशय हटके आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. अशावेळी एक चांगलं कथानक आणि मातब्बर कलाकारांचा अभिनय याचा अनुभव प्रेक्षकांनी मोठ्या पडद्यावर घ्यावा, यासाठी ऑफर फायदेशीर ठरतात. चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाणाऱ्या प्रेक्षकाला एखादी छानशी ऑफर मिळाली की, तो आणखी खूश होतो. मात्र, काहींच्या मते, चित्रपटाच्या कथानकात जर फारसा राम नसेल, तर अशा ऑफर्स देऊन प्रेक्षकांना थिएटरकडे वळण्यास भाग पाडले जाते.

मात्र, ‘वाळवी’ या चित्रपटातून सस्पेन्स कथानक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही भरपूर प्रेम मिळत आहे. आता या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरही यशस्वी घौडदौड सुरू झाली आहे. ‘वाळवी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे. परेश मोकाशी यांची पत्नी आणि अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी यांनी ‘वाळवी’ या चित्रपटाचे लेखन सांभाळले आहे. चित्रपटात सुबोध भावे, स्वप्नील जोशी, अनिता दाते आणि शिवानी सुर्वे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हटके कथानक आणि कलाकारांची फौज यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे.

IPL_Entry_Point

विभाग