मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत खाष्ट सासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री म्हणजे उषा नाडकर्णी. त्यांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. माहेरची साडी या मराठी चित्रपटामुळे त्या संपूर्ण महाराष्ट्रीत प्रेक्षकांच्या मनात घर करुन होत्या. एक बिनधास्त्र, मोकळ्या मनाची आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी मराठी, हिंदीत वेगवेगळ्या भूमिका वठवल्या आहेत. आज १३ सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...
उषा यांचा जन्म १३ सप्टेंबर १९४६ रोजी मुंबईत झाला. 'सिंहासन' या मराठी चित्रपटातून उषा ताई यांनी झगमगत्या दुनियेत पाऊल ठेवले आणि नंतर कधीही मागे वळून पाहिले नाही. फक्त मराठीच सिनेमे नाही तर त्यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केले आहे. १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सडक छाप' चित्रपटात उषा यांनी एका अंध महिलेची भूमिका साकारली होती. त्यांची ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली.
अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर १९९९मध्ये उषा यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले. त्यांच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेम केले. उषा यांची 'पवित्र रिश्ता' ही मालिका विशेष गाजली. या मालिकेत त्या सुशांतसिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेसोबत दिसल्या होत्या. त्यांनी या मालिकेत सविता देशमुखची भूमिका साकारली होती. उषा या नेहमीच त्यांच्या निर्भीड स्वभावामुळे देखील ओळखल्या जायच्या.
वाचा: 'बिग बॉस मराठी'साठी अभिजीत-निक्कीने घेतले लाखो रुपये, सूरज चव्हाणला आठवड्याला किती मिळते फी?
एकदा उषा यांना एका मालिकेची ऑफर आली होती. त्यांनी जवळपास १० दिवस त्या मालिकेत काम केले होते. पण त्या मालिकेत काम करणे उषा यांना आवडत नसल्यामुळे त्यांनी ती मालिका सोडली. मालिका सोडल्यानंतर निर्मात्याने त्यांचे १० दिवसांचे पैसे दिलेच नाहीत. उषा यांनी मॅनेजरला फोन केला तरीही काही फरक पडेना. फोन केल्यावर दर वेळी वेगळी व्यक्ती फोन उचलत असे. अचानक एकदा मॅनेजरनेच फोन उचलला. उषा यांनी मॅनेजरला चांगलेच धारेवर धरले. त्यांचे कामाचे पैसे दिले जाणार की नाही हे त्यांनी पुन्हा एकदा विचारलं. उषा पुढे म्हणाल्या की जर त्याचे मानधन दिले नाही तर त्या ऑफिसमध्ये येऊन जबरदस्तीने पैसे घेतील. यानंतर तिसऱ्याच दिवशी त्यांना त्यांच्या कामाचा धनादेश मिळाला.