Samantha Ruth Prabhu On Divorce : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत घटस्फोटानंतरचा अनुभव सांगितला. यावेळी तिने म्हटले की, घटस्फोटानंतर तिला अनेकदा 'सेकंड हँड' म्हटलं गेलं. तिला अनेक अपमानजनक गोष्टी ऐकाव्या लागल्या. अभिनेत्री म्हणाली की, घटस्फोटानंतर समाजात महिलांची ओळख आणि त्यांचे मूल्य यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. या मानसिकतेच्या विरोधात तिने आपले मत मांडत याचा विचार करण्याची गरज असल्याचे म्हटले होते.
गॅलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत समंथा म्हणाली की, 'जेव्हा एखाद्या महिलेचा घटस्फोट होतो, तेव्हा तिला खूप लाजिरवाण्या प्रसंगांना आणि अपमानाला सामोरे जावे लागते. घटस्फोटित महिलांवर लोक खूप कमेंट करतात. लोक मलाही अनेकदा सेकंड हँड म्हणतात, वापरून टाकलेली म्हणतात. इतकंच नाही तर,माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले असेही लोक ठरवून मोकळे झाले आहेत. इतकेच नाही तर, घटस्फोटित महिलेला ती अपयशी आहे, अशी भावना तिच्या मनात निर्माण केली जाते.'
समंथा म्हणाली, 'माझ्याबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी बोलल्या गेल्या. खोटे पसरवले गेले. त्यावेळी मला त्यांना उत्तर द्यावेसे वाटले. पण नंतर मला वाटायचे की, एका क्षणासाठी हे लोक माझी स्तुती करतील, पण थोड्या वेळाने ते पुन्हा माझ्याबद्दल अशाच गोष्टी बोलतील. आधी मला या सगळ्या गोष्टींचं खूप वाईट वाटायचं. मी एका कोपऱ्यात बसून खूप रडायचे. कसे जगायचे हेच मी विसरून गेले होते. पण नंतर हळूहळू मला जाणवलं की, माझं आयुष्य संपलेलं नाही. मी सर्वकाही हाताळू लागतर आणि आज मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. मी खूप काही शिकले आहे. चांगले काम करत आहे आणि मी माझ्या आयुष्याच्या पुढील टप्प्याची वाट पाहत आहे.'
समंथाने २०१७मध्ये साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यशी लग्न केले होते. पण, २०२१मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर समंथाला आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्याच वेळी, नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी ८ ऑगस्ट रोजी साखरपुडा केला. दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या खासगी सोहळ्याचे काही फोटो शेअर केले होते. तर, अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या नवीन स्पाय-ॲक्शन सीरिज 'सिटाडेल: हनी बनी'मुळे चर्चेत आहे.