Urvashi Rautela Cut Gold Cake On Birthday: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने २५ फेब्रुवारीला तिचा ३०वा वाढदिवस साजरा केला. यावेळी अभिनेत्री खास मित्र, रॅपर हनी सिंहसोबत मिळून केक कापला. यावेळी उर्वशी रौतेला हिच्या बर्थडे केकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. अभिनेत्रीने तिच्या ३०व्या वाढदिवशी चक्क २४ कॅरेट सोन्याचा केक कापला आहे. हा सोन्याचा केक उर्वशी रौतेला हिला रॅपर हनी सिंहने गिफ्ट केला होता. उर्वशी रौतेलाने कापलेल्या या केकची किंमत तब्बल ३ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी उर्वशी रौतेलाचे कौतुक करताना हनी सिंह म्हणाला की, ती खरोखरच जगातील सर्वात सुंदर मुलगी आहे आणि म्हणूनच मी तिला 'लव्ह डोस'साठी साइन केले होते. हनी सिंहच्या आतापर्यंत गाजलेल्या सर्वाधिक हिट रॅप्समध्ये ‘लव्ह डोस’ या गाण्याचा समावेश आहे.
हनी सिंहने त्याची मैत्रीण उर्वशी रौतेला हिच्याबद्दल बोलताना सांगितले की, त्याने अभिनेत्रीला तिच्या करिअरमध्ये पुढे जाताना पाहिले आहे आणि त्यामुळेच ती आज आंतरराष्ट्रीय स्टार बनली आहे. हनी सिंग म्हणाला की, उर्वशीसारख्या जगभरात गाजणाऱ्या अभिनेत्रीला शाही वागणुकच दिली गेली पाहिजे. आणि म्हणूनच मी तिच्यासाठी हा ३ कोटी रुपयांचा खास केक घेऊन येण्याचा निर्णय घेतला. मला भविष्यातही उर्वशीसोबत काम करायला आवडेल आणि हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असेल.’
उर्वशी रौतेलालाही हनी सिंहने दिलेली ही भेट इतकी आवडली आहे की, तिने ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या प्रोफाइलवर या केकचा फोटो टाकला आहे. उर्वशी रौतेलाने या केकसोबत तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. केकसोबतची आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना अभिनेत्रीने लिहिले की, ‘लव्ह डोस २च्या सेटवर वाढदिवसाचे सेलिब्रेशन. २४ कॅरेट सोन्याचा केक.’ अभिनेत्रीच्या फोटोंवर लोकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.
उर्वशीच्या या पोस्टवर कमेंट करताना एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, ‘हा केक खायचा आहे की, कापून परत ठेवायचा आहे?’ आणखी एका व्यक्तीने लिहिले की, ‘ही खूपच शो ऑफ करते.’ हनी सिंह आणि उर्वशी रौतेला यांची मैत्री खूप जुनी आहे. पण, तो तिचा वाढदिवस इतका खास बनवेल, असे कुणालाही वाटले नव्हते.
संबंधित बातम्या