सगळ्यांनीच आपले संसार मांडले तर या विश्वाचा संसार कोण मांडणार?, 'रघुवीर' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शत-upcomoing marathi movie raghuveer trailer is out ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सगळ्यांनीच आपले संसार मांडले तर या विश्वाचा संसार कोण मांडणार?, 'रघुवीर' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शत

सगळ्यांनीच आपले संसार मांडले तर या विश्वाचा संसार कोण मांडणार?, 'रघुवीर' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शत

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 08, 2024 06:05 PM IST

Raghuveer Movie Trailer: गेल्या काही दिवसांपासून 'रघुवीर' या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.

Raghuveer Trailer
Raghuveer Trailer

महाराष्ट्राला महान साधू-संतांची थोर परंपरा लाभली आहे. याच परंपरेतील संत समर्थ रामदास स्वामी यांची थोरवी खूप मोठी आहे. सर्वसामान्यांसाठी मनाचे श्लोक आणि दासबोधसारखा महान ग्रंथ लिहिणारे तसेच सुखकर्ता दुःखहर्ता हि दैनंदिन पूजेतील आरती रचणारे समर्थ रामदास स्वामी यांचे चरित्र प्रथमच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'रघुवीर' या आगामी चित्रपटाद्वारे समर्थांचा महिमा जगासमोर येणार आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

'रघुवीर' हा आगामी चित्रपट खऱ्या अर्थाने प्रभू श्रीराम भक्त आणि समर्थ रामदास स्वामींच्या अनुयायांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. 'रघुवीर' या चित्रपटाद्वारे प्रथमच रामभक्त समर्थांचं जीवन जगासमोर येणार आहे. या चित्रपटाचा मनमोहक आणि उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये चित्रपटाची झलक पाहिल्यानंतर 'रघुवीर'बाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

काय आहे ट्रेलर

प्रदर्शित करण्यात आलेल्या 'रघुवीर'च्या ट्रेलरच्या सुरुवातीला 'रामाला शोधायला निघालोय', असं म्हणत किशोरावस्थेतील नारायणची ओळख करून देण्यात येते. बालपणापासूनच संसाराच्या मोहातून मुक्त असलेला नारायण लग्नमंडपात भटजींनी 'शुभलग्न सावधान...' असं म्हणताच खऱ्या अर्थाने 'सावध' होतो आणि थेट मंडपातूनच पळ काढतो. त्यानंतर जलाशयातून प्रभू श्री रामारायाची मूर्ती घेऊन दासोपंत असलेल्या रामाच्या दासाची एन्ट्री ट्रेलरमध्ये होते. रामाची गुलामी पत्करलेले दासोपंत आणखी कोणाची गुलामी करायला तयार नसल्याचे बादशाहाला निक्षून सांगतात. 'सुदृढ शरीर हाच खरा दागिना' आणि 'देव दगडात नसून, मनात असतो', अशी शिकवण देणारे समर्थ रामदास स्वामी 'जय जय रघुवीर समर्थ' हा मंत्र जपत प्रगटतात. याच मंत्राने 'रघुवीर'च्या ट्रेलरचा उत्कंठावर्धक शेवट होतो. हा ट्रेलर खऱ्या अर्थाने 'रघुवीर' चित्रपटाची झलक दाखवणारा आहे.
वाचा: जॉन अब्राहमनं घेतली ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकर हिची भेट! फोटो पाहून नेटकरी संतापले, काय आहे कारण?

कधी होणार चित्रपट प्रदर्शित

निलेश अरुण कुंजीर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. समर्थ रामदास स्वामींची भूमिका विक्रम गायकवाड यांनी साकारली आहे. चित्रपटाची कथा फार रिव्हील न करता रामदास स्वामींच्या व्यक्तिमत्त्वातील तीन वेगवेगळ्या वयातील रूपांची झलक ट्रेलरमध्ये दिसते. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येईल तसतशा 'रघुवीर'मधील इतर गोष्टीही प्रेक्षकांना समजतील. खऱ्या अर्थाने जगाला मानवतेचा धर्म शिकवत मनाच्या उपासनेचे सोपे साधन जनमानसाला देणाऱ्या समर्थांचे आॅनस्क्रीन रूप त्यांच्या अनुयायांना तर आवडेलच, पण सर्वसामान्य प्रेक्षकांनाही मोहिनी घालेल अशी आशा कुंजीर यांनी व्यक्त केली. २३ ऑगस्ट रोजी 'रघुवीर' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

विभाग