सध्याचं राजकारण, समाजकारण, नागरिकांची होणारी फरफट आणि त्यातून पेटून उठणारा एक 'युवानेता'. सोशल मीडियावर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘युवानेता’ चित्रपटाच्या पोस्टरने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. लक्षवेधी शीर्षकामुळे तरुणांमध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता दिसत आहे. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘युवानेता’ या चित्रपटात महाविद्यालयातील अंकुर मित्रांसमवेत अन्यायाविरुद्ध नेहमी लढा देतो. अंकुरची वाढलेली लोकप्रियता स्थानिक आमदारास खुपू लागते. आमदार आपली शक्ती वापरुन अंकुरला दाबण्याचा प्रयत्न करतो. मात्र अंकुर न दबता तेवढ्याच त्वेषाने उभारी घेतो. या सर्व गदारोळात मित्र, प्रेम आणि नाती हरवतात का? आणि त्यांची किंमत मोजावी लागते का? हे चित्रपटात प्रकर्षाने कळणार आहे. मनाला प्रश्नांच्या घेऱ्यात अडकवणारं कथानक, गंभीर आणि खोल संवाद, दर्जेदार कलाकारांची जुगलबंदी, मंत्रमुग्ध करणारी गाणी आणि अंगावर शहारे आणणारं पार्श्वसंगीत या समीकरणामुळे ‘युवानेता’ चित्रपटाची चर्चा महाराष्ट्रात सर्वत्र होणार आहे.
रमेश जाधव दिग्दर्शित 'युवानेता' हा चित्रपट २३ ऑगस्ट २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे राजू राठोड, जगदीश कुमावत यांनी निर्मिती केली आहे. कथा अंकुर क्षीरसागर, पटकथा अमित बेंद्रे, संवाद भक्ती जाधव, अंकुर क्षीरसागर, अमित बेंद्रे, छायाचित्रण मयूरेश जोशी, कार्यकारी निर्माता कुणाल निंबाळकर, निर्मिती व्यवस्थापन रवी दीक्षित, प्रसाद कुलकर्णी, कला दिग्दर्शन नितीन बोरकर, दिलीप कंढारे, संकलन विशाल कोटकर, संगीत अमोल नाईक, नीलेश पाटील, गीत राजेश सांगळे, नितीन बागडे, नीलेश पाटील, रंगभूषा सुशांत वाघमारे, वेशभूषा स्मिता धुमाळ, साऊंड रेकॉर्डीस्ट योगेश क्षीरसागर, नृत्यदिग्दर्शन रोहन केंद्रा, मानसी कोवळे, यांनी केले आहे.
वाचा: हे असलं घरात पाहण्यापेक्षा अडल्ट सिनेमा पाहिला असता; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’वर नेटकरी संतापले
“सद्यस्थितीत दूषित झालेलं राजकारण आणि प्रस्थापित नेत्यांच्या स्वार्थी प्रतिमेपलीकडे जाऊन एक आदर्श नेता कसा असावा, या विचाराने ‘युवानेता’ चित्रपटाची निर्मिती झाली आहे. तळागाळातून आलेला आणि समाजभान असलेला अंकुर प्रस्थापितांच्या छाताडावर बसून संघर्षातून सूर्य कसा निर्माण करतो, हे चित्रपटात पहायला मिळणार आहे. आशा आहे की महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना चित्रपट नक्कीच आवडेल” असे चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश रमेश जाधव म्हणाले.