महाराष्ट्राला महान साधू-संतांची थोर परंपरा लाभली आहे. याच परंपरेतील संत समर्थ रामदास स्वामी यांची थोरवी खूप मोठी आहे. सर्वसामान्यांसाठी मनाचे श्लोक आणि दासबोधसारखा महान ग्रंथ लिहिणारे तसेच सुखकर्ता दुःखहर्ता हि दैनंदिन पूजेतील आरती रचणारे समर्थ रामदास स्वामी यांचे चरित्र प्रथमच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'रघुवीर' या आगामी चित्रपटाद्वारे समर्थांचा महिमा जगासमोर येणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रदर्शनाच्या तारखेची सर्वांमध्ये आतुरता होती. आता प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.
'रघुवीर' या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असतानाच नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टवर चित्रपट समर्थ रामदास स्वामी यांची भूमिका कोणता अभिनेता साकारणार हे देखील दाखवण्यात आले आहे. त्यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील समोर आली आहे.
'रघुवीर' हा चित्रपट घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. समर्थांच्या भूमिकेत अभिनेते विक्रम गायकवाड दिसणार असल्याचे उघड झाल्यानंतर 'रघुवीर'बाबतची उत्सुकता आणखी वाढली. 'जय जय रघुवीर समर्थ'चा मंत्र जपत २३ ऑगस्ट या दिवशी 'रघुवीर' सर्वत्र प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.
'रघुवीर' या चित्रपटात विक्रमसोबत ऋतुजा देशमुख, नवीन प्रभाकर, शैलेश दातार, राहुल मेहेंदळे, विघ्नेश जोशी, निनाद कुलकर्णी, भूषण तेलंग, वर्षा दांदळे, मौसमी तोंडवलकर, अनुश्री फडणीस, देव निखार्गे, गणेश माने आदी कलाकारही विविध व्यक्तिरेखांमध्ये दिसतील. डिओपी धनराज सुखदेव वाघ आणि प्रथमेश नितीन रांगोळे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, संकलन जागेश्वर ढोबळे आणि प्रशांत चंद्रकांत कांबळे यांनी केलं आहे.
वाचा: 'गुलिगत' सूरज चव्हाणचे एका दिवसाचे मानधन ऐकून कलाकारांना धक्का, वाचा रिल स्टारच्या मानधनाविषयी
दिग्दर्शक निलेश कुंजीर चित्रपटाविषयी म्हणाले की, ‘समर्थ रामदास स्वामी यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर आणणे हे एक फार मोठे आव्हान आहे. ऐतिहासिक दस्तऐवजांसोबतच इतिहासकालीन साहित्याचा अभ्यास करून मोठ्या पराकाष्ठेने रामदास स्वामींना पडद्यावर सादर केले जाणार आहे. इतर चित्रपटांप्रमाणे हे काम लगेच होणारे नसल्याने व्यवस्थित वेळ घेऊन सर्व काम पूर्ण करून एक दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसमोर ठेवण्यात येतेय. महत्त्वाचे म्हणजे या सिनेमातले मुख्य पात्र हे हिरो म्हणून न वावरता सर्वसामान्य माणसाप्रमाणे ते दिसेल आणि त्यातूनच सामान्यातला असामान्य अशा संत समर्थ रामदास स्वामींचं दर्शन घडवेल अशी भावनाही निलेश कुंजीर यांनी व्यक्त केली.’