Fussclass Dabhade Teaser : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सतत वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. त्यामध्ये दिग्दर्शक हेमंत ढोमेच्या चित्रपटांना प्रेक्षकांची चांगली पसंती असल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या चित्रपटांची खासियत म्हणजे ते वास्तववादी असल्याने प्रेक्षक त्याच्याशी एकरूप होतात. आता 'झिंम्मा' सिनेमाच्या यशानंतर हेमंत ढोमेचा 'फसक्लास दाभाडे!' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला असून सर्वजण चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
'फसक्लास दाभाडे' या चित्रपटाच्या १ मिनिटे ५० सेकंदाच्या टीझरमध्ये दाभाडे कुटुंबीयांची ओळख होते. आणि हे कुटुंब फसक्लास का आहे याचाही अंदाज तुम्हाला येईल. टीझरमध्ये हसतं-खेळतं दाभाडे कुटुंब दिसत असून भावंडांमधील भांडणे, कुरबुरी यात दिसत आहेत. हे सगळे दिसत असतानाच त्यांच्यातील घट्ट नातेही दिसत आहे. दाभाडेंच्या घरातील या तीन खांबांना भेटणं म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. सध्या सोशल मीडियावर हा टीझर धुमाकूळ घालत आहे.
काही दिवसांपूर्वीच दाभाडे कुटुंबीयांनी गुलाबी थंडीत मस्त 'यल्लो यल्लो' हळदीचा जबरदस्त समारंभ साजरा केला. त्यावेळी या दाभाडे कुटुंबाची थोडी तोंडओळख प्रेक्षकांना झालीच होती. आता ही भावंडे किती मस्तीखोर आहेत हे टीझरवरुन सर्वांना कळाले आहे. या मस्तीखोर भावंडांची कथा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
खुळ्या भावंडांची ही इरसाल स्टोरी प्रेक्षकांना २४ जानेवारीपासून मोठ्या पडद्यावर पाहाता येणार आहे. या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. टी-सीरीज, कलर येल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी निर्मित 'फसक्लास दाभाडे'चे भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत.
वाचा: वहिदा रहमान यांनी डेब्यू केलेला सिनेमा आठवतोय का? ठरला होता १९५६मध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा
‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचा दिग्दर्शन करणाऱ्या हेमंत ढोमेने सिनेमाविषयी आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणतात, ‘फसक्लास दाभाडे’ हा फक्त एक चित्रपट नाही तर कुटुंबातील विविध पैलूंना हसत-खेळत उलगडणारी एक सफर आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातल्या जुन्या क्षणांचा, आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक आठवणींना उजाळा देणारा एक फोटो अल्बमच आहे. प्रत्येक प्रेक्षकाला हा चित्रपट आपलासा वाटेल याची खात्री आहे.
संबंधित बातम्या