Karmayogi Abasaheb: महाराष्ट्राचं राजकारण कुठं चाललंय? 'कर्मयोगी आबासाहेब' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Karmayogi Abasaheb: महाराष्ट्राचं राजकारण कुठं चाललंय? 'कर्मयोगी आबासाहेब' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

Karmayogi Abasaheb: महाराष्ट्राचं राजकारण कुठं चाललंय? 'कर्मयोगी आबासाहेब' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 18, 2024 08:56 AM IST

Karmayogi Abasaheb Movie: आबासाहेबांचे जीवन व कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्याच्या राजकारण आणि समाजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Karmayogi Abasaheb Marathi Movie
Karmayogi Abasaheb Marathi Movie

Karmayogi Abasaheb Movie: वारकरी कुटुंबातील पार्श्वभूमी असलेल्या गणपतराव देशमुख, ज्यांनी सांगोला मतदारसंघातून तब्बल ११ वेळा आमदार म्हणून निवडून येऊन ५५ वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, यांचे जीवन आता चित्रपटाच्या पडद्यावर उलगडणार आहे. ‘कर्मयोगी आबासाहेब’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून सर्वजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

काय आहे चित्रपटाचा ट्रेलर?

'कर्मयोगी आबासाहेब' या चित्रपटाच्या २ मिनिटे १० सेकंदाच्या ट्रेलरमध्ये गणपतराव देशमुख यांच्या आयुष्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय मा. गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांच्या जीवनकार्याचा वेध या चित्रपटात घेण्यात आला आहे. समाजकारण करत असताना त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनेक चढ-उतारांवर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आल्याचे ट्रेलरमधून दिसत आहे. त्यामुळे सर्वजण आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहात आहेत.

काय असणार चित्रपटाची कथा?

राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण आता चांगलंच तापू लागलं आहे. निवडणुकीची आचारसंहिताही लागू झाली आहे. आता प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. मात्र, समाजाचा उद्धार, उन्नती करण्यासाठी मा. गणपतराव देशमुख यांच्यासारखे नेते विरळच... त्यामुळेच 'कर्मयोगी आबासाहेब' या चित्रपटातून मा. गणपतराव देशमुख यांच्या हळव्या, कर्तव्यकठोर, कृतीशील, विचारी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्यात आला आहे. अकरा वेळा आमदार म्हणून निवडून येताना त्यांनी केलेला संघर्ष, त्यातलं राजकारण उलगडतानाच त्यांनी केलेला विकास, सुधारणा, शेतकरी, वंचित घटकांसाठीचं काम दाखवण्यात आलं आहे. त्यामुळेच जनतेनं आबासाहेबांवर अलोट प्रेम केलं. या सर्वांचं दर्शन 'कर्मयोगी आबासाहेब' सिनेमा होणार आहे.
वाचा: पहिले लग्न मग ४ वर्षात घटस्फोट, दादा कोंडके यांच्या पत्नीविषयी माहिती आहे का?

कोणते कलाकार दिसणार?

चित्रपटात अनिकेत विश्वासराव हा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर, हार्दिक जोशी, देविका दफ्तरदार, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, सुरेश विश्वकर्मा, अरबाज शेख, तानाजी गलगुंडे, घन:श्याम दरवडे (छोटा पुढारी), अहमद देशमुख, वृंदा बाळ, निकिता सुखदेव, अली शेख, आणि अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात त्यांच्या संघर्षाची, योगदानाची आणि समाजासाठी केलेल्या कार्याची कहाणी दर्शवण्यात येणार आहे. त्यांच्या जीवनातील विशेष क्षण आणि आव्हाने चित्रपटात वेगळ्या पद्धतीने उलगडले जातील. २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेतही हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.

Whats_app_banner