अनोळखी शहरात सुरू झालेल्या मैत्रीचा खास प्रवास, 'गुलाबी' सिनेमाचा मजेशीर टीझर प्रदर्शित
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अनोळखी शहरात सुरू झालेल्या मैत्रीचा खास प्रवास, 'गुलाबी' सिनेमाचा मजेशीर टीझर प्रदर्शित

अनोळखी शहरात सुरू झालेल्या मैत्रीचा खास प्रवास, 'गुलाबी' सिनेमाचा मजेशीर टीझर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 10, 2024 03:08 PM IST

Gulabi Teaser: अभिनेत्री मृणाल कुलकर्णी मुख्य भूमिकेत असणारा 'गुलाबी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तीन मैत्रिणींची कथा दाखवण्यात येणार आहे. आता सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Mrunal Kulkarni
Mrunal Kulkarni

Gulabi Movie Teaser: गेल्या काही दिवसांपासून मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. हे चित्रपट प्रेक्षकांच्या देखील विशेष पसंतीला उतरताना दिसत आहेत. अभिनेत्री आणि निर्माती मृणाल कुलकर्णीदेखील हटके विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. नुकताच मृणालने तिच्या आगामी चित्रपटाची 'गुलाबी'ची घोषणा केली आहे. सोबतच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

नवरात्रीची आठवी माळ म्हणजे अष्टमी. आजचा रंग गुलाबी असल्याने बहुप्रतीक्षित 'गुलाबी' चित्रपटाचा धमाकेदार टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टिझरमध्ये जयपूरच्या गुलाबी नगरीत तिघींच्या नवीन प्रवासाची कहाणी पाहायला मिळत आहे. मैत्री, प्रेम, स्वप्ने, नाती या भावनांच्या विश्वात रंगून जाणाऱ्या स्त्रिया जेव्हा स्वतःच्या विश्वात जगायला सुरुवात करतात आणि स्वतःला उलगडू पाहातात, तेव्हा त्यांच्या आयुष्याचा हा प्रवास किती आनंददायी असतो, याचा अनुभव 'गुलाबी' देणार आहे.

काय आहे चित्रपटाचा टीझर?

'गुलाबी' चित्रपटाच्या १ मिनिटाच्या टीझरमध्ये अनोळखी शहरात भेटलेल्या तीन मैत्रिणींची कथा दाखवण्यात आली आहे. टीझरमध्ये श्रुती मराठे, अश्विनी भावे आणि मृणाल कुलकर्णी धमाल करताना दिसत असतानाच यात जयपूर नगरीचे सौंदर्यही दिसत आहे. तीन वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रिया जयपूर शहरात एकत्र येऊन काय धमालमस्ती करतात, जयपूरमधील तिघींचा हा प्रवास काही वेगळं उलगडू पाहात आहे का, हे पाहाणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

कधी प्रदर्शित होणार सिनेमा?

‘गुलाबी’ हा चित्रपट येत्या २२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित या चित्रपटात श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे, सुहास जोशी, शैलेश दातार, अभ्यंग कुवळेकर आणि निखिल आर्या अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. एकंदरीत स्टारकास्ट पाहात चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

दिग्दर्शकाने व्यक्त केल्या चित्रपटाविषयी भावना

‘’अष्टमीच्या शुभदिनी आम्ही या स्त्रीप्रधान चित्रपटाचे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहोत. चित्रपट स्त्रिप्रधान असला तरी हा आजच्या स्त्रीचा आहे. नाती, विचार, अस्तित्व, स्वप्नं या सगळ्यांचा गुलाबी प्रवास यातून उलगडणार आहे. कधी हसवणारा तर कधी भावनिक करणारा हा चित्रपट प्रत्येक पुरूषाने आपल्या आई, बहिण, बायको, मुलगी आणि मैत्रीणीसोबत अवश्य पाहावा’’ असे दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर यांनी म्हटले आहे.

Whats_app_banner