Rapper Badshah Club Bomb Blast : चंदीगडमधील दोन नाईट क्लबबाहेर मंगळवारी सकाळी स्फोट झाले. सेक्टर २६ मधील सेव्हिल बार अँड लाउंज आणि डिओरा क्लबबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोन नकाबपोशांनी बॉम्ब फेकले आणि घटनास्थळावरून पसार झाले. प्रसिद्ध रॅपर बादशाहचा सेव्हिल बार अँड लाउंज क्लबमध्ये भागीदारीआहे. या स्फोटामुळे क्लबबाहेरील काचा फुटल्या होत्या. क्लबच्या बाहेर देशी बॉम्ब फेकण्यात आले असून, ते कमी तीव्रतेचे असल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून नमुने घेतले आहेत.
दरम्यान, राजधानी चंदीगडमधील या घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ डिसेंबरला चंदीगडला येत आहेत. ज्या भागात हे स्फोट झाले तो भाग चंदीगडचा अतिशय गर्भश्रीमंतांची वस्ती असलेला भाग आहे.
डीएसपी दिलबाग सिंह यांनी सांगितले की, 'पहाटे ३.२५ वाजता आम्हाला कंट्रोल रूममध्ये माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळी गेले असता क्लबच्या काचा तुटल्या होत्या. जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सेक्टर-२६ पोलिस ठाण्यासमोरून हे दोन आरोपी आले. आरोपींनी दुचाकी स्लिप रोडवर पार्क केली. सर्वप्रथम त्यांनी सेव्हिल बार अँड लाउंजच्या बाहेर देशी बॉम्ब फेकला. त्यानंतर ते डिओरा क्लबबाहेर बॉम्ब फेकण्यासाठी गेले. या दोन्ही क्लबमध्ये अवघे ३० मीटरचे अंतर आहे.
चंदीगडमधील क्लबच्या बाहेर स्फोट झाले तेव्हा क्लब बंद होते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी फक्त सुरक्षारक्षक होते, त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. गार्ड पूर्णा सिंह यांनी सांगितले की, आरोपी दुचाकीवरून आले होते. एक तरुण दुचाकीवर उभा होता, तर दुसऱ्या तरुणाने स्फोटके फेकली. दोन्ही आरोपींची तोंडे कापडाने झाकलेली होती.
या घटनेमागे खंडणीच्या अँगलचाही पोलिस तपास करत आहेत. गुंडांनी चंदीगडमधील अनेक क्लब चालकांकडून पैसे उकळले असून, अनेकांना धमक्याही मिळाल्या आहेत. अशा परिस्थितीत वसुली हा या घटनेमागचा हेतू असू शकतो. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
दोन महिन्यांपूर्वी चंदीगडमधील सेक्टर-१० मधील पॉश भागात निवृत्त प्राचार्यांच्या घरावर ग्रेनेड हल्ला झाला होता. यामुळे घरात ७ ते ८ इंचाचा खड्डा पडला. खिडक्यांच्या काचा फुटल्या. घटनेनंतर हल्लेखोरांपैकी तीन जण रिक्षातून आले होते आणि त्याच रिक्षातून पसार झाले होते. भाड्याने राहणाऱ्या पंजाब पोलिसांच्या निवृत्त एसपीची हत्या करण्याच्या उद्देशाने हल्लेखोर येथे आले होते.