गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडची बेबो करीना कपूर खानचा 'द बकिंगहॅम मर्डर' चर्चेत आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. आता हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटासोबतच पुन्हा एकदा हॉरर चित्रपट 'तुंबाड' प्रदर्शित झाला. पण तुंबाड या चित्रपटाने करीनाच्या 'द बकिंगहॅम मर्डर'ला चांगलीच टक्कर दिली आहे. दिवसेंदिवस तुंबाडच्या कमाईत वाढ होत असून 'द बकिंगहॅम मर्डर' चित्रपटाच्या कमाईत घट होताना दिसत आहे.
सोहम शाहच्या तुंबाड या चित्रपटासाठी २०२४ हे वर्ष लकी ठरले आहे. २०१८ साली जेव्हा हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी यावेळी प्रेक्षक हा चित्रपट उत्साहाने पाहाताना दिसत आहेत. चित्रपटाच्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे. तसेच येत्या काळात कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
तुंबाड या भयपटाच्या पहिल्या दिवशी (शुक्रवारी) कमाईबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने १.६५ कोटींची कमाई केली. या चित्रपटाने शनिवारी २.६५ कोटी, रविवारी ३.०४ कोटी, सोमवारी १.६९ कोटी आणि मंगळवारी १.६६ कोटींची कमाई केली. अशा प्रकारे या चित्रपटाने आतापर्यंत १०.६९ कोटींची कमाई केली आहे. २० सप्टेंबर हा राष्ट्रीय चित्रपट दिन आहे. या खास निमित्ताने चित्रपटाच्या कमाईत वाढ होऊ शकते.
वाचा: अभिजीत सावंतने केली शाहरुख खानची नक्कल, वर्षा उसगावकरांनी केले कौतुक
तुंबाड हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याची ओपनिंग वीकेंड कमाई ३.२५ कोटी रुपये होती. मात्र, रि-रिलीजमध्ये चित्रपटाची कमाई रिलीजपेक्षा जास्त आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा चित्रपट थिएटरमधून केवळ १३.२५ कोटींची कमाई करू शकला होता. यावेळी हा चित्रपट याच वेगाने चालत राहिला तर लवकरच तो प्रदर्शनाचा टप्पा पार करेल.
द बकिंगहॅम मर्डर्सचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले असून यात करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहे. थ्रिलर प्रकारातील हा मेहता यांचा पहिला प्रोजेक्ट आहे. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करताना दिसत नाही. या चित्रपटापेक्षा रि-रिलीज चित्रपट जास्त कमाई करताना दिसत आहेत.
संबंधित बातम्या