Tu Chal Pudha Serial Twist: छोट्या पडद्यावरील मालिका विश्वात सध्या ‘तू चाल पुढं’ या मालिकेची जोरदार चर्चा सुरू आहे. या मालिकेतील काही कलाकारांनी नुकतीच प्रेक्षकांना मालिकेच्या शेवटाची हिंट दिली होती. मात्र, आता शेवट नव्हे, तर मालिकेत एक मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सध्या सोशल मीडियावर श्रेयस म्हणजेच अभिनेता आदित्य वैद्यचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अश्विनीचा श्रेयस चक्क दुसऱ्याच मैत्रिणीसोबत पती-पत्नीप्रमाणे पूजा करताना दिसला आहे.
अश्विन आणि श्रेयस यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. मात्र, दोघांनीही नेहमीच सगळ्याला खंबीरपणे तोंड दिलं. मात्र, आता कथेच्या शेवटला श्रेयस अश्विनीची साथ सोडणार की, काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ‘तू चाल पुढं’ या मालिकेत ‘श्रेयस’ साकारणाऱ्या अभिनेता आदित्य वैद्य याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो अगदी नववधू प्रमाणे नटून बसलेल्या मीराच्या सोबत पूजेला बसताना दिसला आहे. आता मीराचा डाव नक्की काय असणार? ती श्रेयसला फसवू शकणार का? याची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत. मात्र, तत्पूर्वी अभिनेत्याच्या या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये रसिक प्रेक्षकांनी चर्चांना सुरुवात केली आहे.
आदित्यच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलीच हवा केली आहे. या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये एका चाहत्याने विचारलं की, ‘दादा तुझ्यासोबत ही कशी? आमची अश्विनी कुठे आहे?’ आणखी एक चाहत्याने कमेंट करत म्हटलंय की, ‘सर तुमचा अभिनय फारच छान आहे. आम्ही सगळे श्रेयस आणि अश्विनीवर खूप प्रेम करातो. सर, अश्विनीला काय वाटेल.. हे लग्न करू नका प्लिज. असा शेवट करू नका. आम्ही तुमची सिरीयल रोज पाहतो, प्लीज असा शेवट नका होऊ देऊ.’
काही चाहत्यांनी या सीनची खिल्ली उडवत म्हटले की, ‘उजव्या बाजुला बासवायला हवे होते. असो हा मान अश्विनीचा आहे.. पण यांचा अभिनय भारी आहे.’ तर, आणखी एकाने लिहिले की, ‘दिग्दर्शकला कदाचित माहित नसावं... कोणत्याही पूजेला नवरा बायको बसणार असतील, तर बायको ही नेहमी नवऱ्याच्या उजव्या बाजूला बसते....! अश्या अनेक चुका आपण सीरिअल मध्ये पाहत आहोत...! हे सेटवरील बऱ्याच जणांना माहित असतं.’