Tu Chal Pudha Latest Update: छोट्या पडद्यावरील ‘तू चाल पुढं’ या लोकप्रिय मालिकेत आता मोठा धक्कादायक ट्वीस्ट येणार आहे. सध्या या मालिकेत शिल्पीचे सगळेच डाव उलट पडलेले दिसत आहेत. वाघमारेंचं घर बळकावण्यासाठी शिल्पीने अनेक कट रचले. तिच्या याच कटामुळे अश्विनी आणि श्रेयस दोघांना आपल्या मुलींना घेऊन राहतं हक्काचं घर सोडावं लागलं होतं. यानंतर शिल्पीने विद्युतला घटस्फोट देऊन विक्रमसोबत प्रेमाचं नाटक केलं. मात्र, तिचे सगळेच डाव उलटे पडले होते. आता ती पुन्हा एकदा अश्विनी आणि विद्युत यांना धक्का देताना दिसणार आहे.
शिल्पीने विद्युतसोबतचा आपला हसता खेळता संसार स्वतःच्या हाताने मोडला. या घटस्फोटाच्या केस दरम्यान मुलाच्या म्हणजेच संजूच्या कस्टडीवरून दोघांमध्ये चांगलेच वाद निर्माण झाले होते. मात्र, अखेर सगळे पुरावे पाहता कोर्टाने संजूचा ताबा त्याच्या बाबांकडे म्हणजेच विद्युतकडे दिला. तर, शिल्पी ही संजूची आई असल्याने तिला आठवड्यातून एक दिवस काही तासांसाठी संजूला भेटता येईल, असा आदेश देखील कोर्टाने दिला. याचाच राग मनात धरून शिल्पीने अश्विनी आणि तिच्या मुलींना देखील एकमेकींपासून दूर करण्याचा प्रयत्न केला.
घटस्फोट घेतल्यानंतरही विद्युतचे शिल्पीवरील प्रेम अजिबातही कमी झालेले नाही. तो सतत तिला पुन्हा एकत्र राहण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, शिल्पी यासाठी नकार देताना दिसत आहे. शिल्पी परत येणार नाहीच हा तिचा निर्णय झाल्याचे समजून, आता विद्युतने दुसरे लग्न करून संसार थाटावा यासाठी त्याची बहीण म्हणजेच अश्विनी आग्रह करणार आहे. बहिणीचे बोल आता विद्युतला देखील पटणार असून, तो दुसऱ्या लग्नासाठी तयार होणार आहे. मात्र, त्याचवेळी शिल्पी दोघांनाही एक मोठा धक्का देणार आहे.
घटस्फोटानंतरही चुकून शिल्पी आणि विद्युत एकमेकांच्या जवळ आले होते. यामुळे आता शिल्पी पुन्हा आई होणार असल्याचा कयास बांधला जात आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन शिल्पी आता विद्युत, अश्विनी आणि संपूर्ण कुटुंबाला स्वतःच्या तालावर नाचायला भाग पाडणार आहे. मालिकेत हा नवा ट्वीस्ट नेमका काय असणार, हे येणाऱ्या भागांमध्ये कळणार आहे.