Tu Chal Pudha Latest Episode: ‘तू चाल पुढं’ या मालिकेत आता प्रेक्षकांना अनपेक्षित असा धक्का मिळणार आहे. प्रत्येक वेळी सगळ्यांच्या वाईटावर उठणारी शिल्पी आता स्वतःच मोठ्या संकटात अडकणार आहे. आता शिल्पी एका अशा कचाट्यात अडकणार आहे, जिथून बाहेर पडणं तिच्यासाठी केवळ अशक्य असणार आहे. लवकरच मालिकेत हा नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. अश्विनी आणि श्रेयस यांना घराबाहेर काढण्याचा प्लॅन बनवणारी शिल्पी आता त्यांच्याकडेच मदतीसाठी हात पसरणार आहे.
श्रेयस आणि अश्विनीला त्यांच्या कुटुंबासकट घराबाहेर काढता यावं, म्हणून शिल्पीने फार मोठा डाव रचला होता. या कटाचा भाग म्हणून शिल्पीने आपला बहरलेला संसार देखील मोडला. विद्युतसोबत घटस्फोट घेतला तर, आपण भविष्यातील तरतूद म्हणून राहतं घर स्वतःच्या नावावर करून घेऊ. इतकंच नाही तर, घर नावावर झालं की, याच घरातून श्रेयस आणि अश्विनीला धक्के मारून बाहेर काढून, असा विचार शिल्पीने केला होता. याच योजनेप्रमाणे तिने विद्युतला घटस्फोट दिला. मात्र, विद्युतसोबत नातं तुटल्यानंतर त्यांचा मुलगा संजू याचा ताबासुद्धा विद्युतकडेच गेला.
दुसरीकडे आपल्या सगळ्यात खेळात एकतरी साथीदार हवा म्हणून शिल्पीने विद्युतचा मित्र विक्रम याच्याशी मैत्री करून, प्रेमाचं नाटक देखील केलं. माझं तुझ्यावर प्रेम आहे, आपण लग्न करू, त्यासाठीच हा खटाटोप सुरू आहे, अशी भूल शिल्पीने विक्रमला घातली. त्यामुळे शिल्पीच्या डावात सामील झाला नसला, तरी विक्रमने तिला रोखण्याचाही प्रयत्न केला नाही. शिल्पीवर प्रेम असल्याने तो सतत तिला वेळ देत राहिला. तिच्या प्रत्येक गोष्टी आणि भावना समजून घेत राहिला. मात्र, आता सगळं मार्गी लागल्यानंतर देखील शिल्पी आपल्याशी लग्न करण्याचं नाव घेत नाहीये म्हटल्यावर आता विक्रम स्वतःच पुढाकार घेणार आहे.
विक्रम आता शिल्पीच्या घरी जाऊन सगळ्यांसमोर तिला लग्नासाठी प्रपोज करणार आहे. मात्र, विक्रमच्या या प्रपोजला शिल्पी थेट नकार देणार आहे. इतकंच नाही तर, आपण गर्भवती असल्याचं देखील ती यावेळी जाहीर करणार आहे. आपल्या पोटातील बाळ हे आपलं आणि विद्युतचं असल्याचं ती सगळ्यांना सांगणार आहे. मात्र, आता शिल्पीवर कुणी विश्वास ठेवू शकेल का? विद्युत तिचा स्वीकार करेल का? शिल्पीची ही एखादी नवी खेळी तर नसेल ना? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळणार आहेत.