Tu Chal Pudha Latest Episode: ‘तू चाल पुढं’ या मालिकेत आता पुन्हा एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. एकीकडे अश्विनी स्वतःच्या व्यवसायात यशाची शिखरं गाठत आहे. मात्र, या प्रवासात तिच्यासमोर आता अनेक नवी संकटं उभी राहिली आहेत. घर आणि व्यवसाय सांभाळणाऱ्या अश्विनीला सतत असं वाटत आहे की, तिचं तिच्या मुलींकडे दुर्लक्ष होत आहे. या सगळ्यातच शिल्पी तिच्या डोक्यात मयुरीबद्दल संशयाचा किडा सोडून देते. यामुळे आता अश्विनी आपल्या मुलीवर संशय घेऊ लागली आहे. यातच आता शिल्पीने प्रतीकला देखील ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीकला सतत कुणाचा तरी फोन येत असतो. हा फोन येताच प्रतीक कावराबावरा होऊन जातो. सगळ्यांनीच त्याला याबद्दल विचारणा केली. मात्र, एक क्लायंट आपल्याला सतत त्रास देत असल्याचे तो म्हणतो. मात्र आता त्याला फोन करणाऱ्या या व्यक्तीचा चेहरा समोर आला आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून, शिल्पी आहे. मयुरीला हाताशी धरून तिला त्रास देऊन आपण अश्विनीला उद्ध्वस्त करू शकतो, असा नवा प्लॅन तिने आखला आहे.
आपला डाव यशस्वी व्हावा म्हणून शिल्पी प्रतीकला हाताशी धरून सगळ्यांना त्रास देत आहे. यासाठी शिल्पी प्रतीकला ब्लॅकमेल करत आहे. प्रतीकने मयुरीला फसवावं म्हणून ती त्याच्यावर दबाव टाकत आहे. काहीही करून आपण अश्विनीला तिच्या मुलींपासून दूर करणारच असा निर्धार तिने केला आहे. आता प्रतीक मात्र मोठ्या अडचणीत सापडला आहे.
अश्विनीला ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेत असिस्ट करणारा प्रतीक आता मयुरीचा चांगला मित्र झाला आहे. इतकचं नाही तर, त्याने घर सोडून बाहेर पडलेल्या अश्विनीच्या कुटुंबाला एखाद्या मुलाप्रमाणे आधार दिला आहे. प्रतीकनेच स्वतःचं घर अश्विनीला राहण्यासाठी देऊन, त्यांचा मोठा प्रश्न सोडवला होता. मात्र, या दरम्यान प्रतीक आणि मयुरी यांची मैत्री आता हळूहळू प्रेमाचं रूप धारण करत आहे. प्रतीकने आधीच मयुरीकडे आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. मात्र, आता शिल्पीचा डाव समोर आल्यानंतर प्रतीक खरंच मयुरीच्या प्रेमात आहे की, तो देखील तिला फसवत आहे, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. याचा उलगडा आता मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये होणार आहे.
संबंधित बातम्या