Tu Chal Pudha: अखेर शिल्पी अश्विनीला सांगणार आपलं गुपित! ‘तू चाल पुढं’मध्ये येणार नवं वळण-tu chal pudha latest episode shilpi tells about her pregnancy to ashwini ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tu Chal Pudha: अखेर शिल्पी अश्विनीला सांगणार आपलं गुपित! ‘तू चाल पुढं’मध्ये येणार नवं वळण

Tu Chal Pudha: अखेर शिल्पी अश्विनीला सांगणार आपलं गुपित! ‘तू चाल पुढं’मध्ये येणार नवं वळण

Jul 15, 2023 02:30 PM IST

Tu Chal Pudha Latest Episode: अश्विनीच्या आयुष्यात एकीकडे सुखाचे दिवस येत असताना आता पुन्हा एकदा तिला मोठा धक्का बसणार आहे.

Tu Chal Pudha
Tu Chal Pudha

Tu Chal Pudha Latest Episode: तू चाल पुढं’ या मालिकेत आता नवं वळण पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता एक भावनिक वळण पाहायला मिळणार आहे. अश्विनीच्या आयुष्यात एकीकडे सुखाचे दिवस येत असताना आता पुन्हा एकदा तिला मोठा धक्का बसणार आहे. शिल्पी आणि विद्युतचा घटस्फोट झालेला असताना आता आपल्या भावाने म्हणजेच विद्युतने त्याच्या आयुष्यात पुढे जावं म्हणून त्याला अश्विनी दुसऱ्या लग्नाचा सल्ला देणार आहे. पण त्याचवेळी आता शिल्पी एक मोठा खुलासा करणार आहे. ज्यामुळे सगळ्यांच्याच आयुष्यात एक नवं वादळ येणार आहे.

सध्या ‘तू चाल पुढं’ या मालिकेत शिल्पीचे सगळेच डाव उलट पडलेले दिसले होते. वाघमारेंचं घर बळकावण्यासाठी शिल्पीने अनेक कट रचले होते. मात्र, तिचे सगळे डाव फसले. तिच्या सततच्या कटकारस्थानांमुळे अश्विनी आणि श्रेयस दोघांना आपल्या मुलींना घेऊन राहतं हक्काचं घर सोडावं लागलं होतं. यानंतर शिल्पीने विद्युतला घटस्फोट देऊन विक्रमसोबत प्रेमाचं नाटकही केलं. मात्र, इथेही तिचा डाव फसला आहे. शिल्पीची एका रात्रीची चूक आता तिला भारी पडणार आहे.

अश्विनीला त्रास देण्यासाठी शिल्पीने विद्युतसोबतचा आपला हसता खेळता संसार देखील मोडला. यानंतर आई आणि मुलात म्हणजे शिल्पी आणि संजू यांच्या नात्यात देखील अंतर पडले. शिल्पीची वागणूक पाहून संजूचा ताबा कोर्टाने त्याच्या वडिलांकडे म्हणजेच विद्युतकडे दिला. मात्र, शिल्पीला केवळ आठवड्यातून एकदा संजूला भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. याच दरम्यान एकदा संजूला भेटायला आलेली शिल्पी त्याच्या आजारपणामुळे घरातच थांबली होती. मात्र, याचवेळी विद्युत आणि शिल्पी एकमेकांच्या जवळ आले. यामुळेच शिल्पी आता पुन्हा आई होणार आहे.

विद्युतच्या घरून आल्यापासून शिल्पीला त्रास सुरू झाला होता. काही दिवसानंतर तिने डॉक्टरकडून तपासणी करून घेतली. यावेळी ती पुन्हा एकदा आई होणार असल्याचे समोर आले आहे. आता शिल्पी हीच गोष्ट अश्विनीला सांगणार आहे. एकीकडे आपल्या भावाचा दुसरा संसार उभा करायला निघालेली अश्विनी हे ऐकून हादरून जाणार आहे. मात्र, यामुळे आता ती पुन्हा एकदा कोंडीत सापडणार आहे.

Whats_app_banner
विभाग