TRP Report Marathi Serials: मराठी मालिका विश्वात सध्या अनेक मालिका बाजी मारताना दिसत आहेत. अनेक नव्या मालिका गेल्या काही काळात छोट्या पडद्यावर दाखल झाल्या आहेत. आता या मालिकांच्या भाऊगर्दीत कोणी बाजी मारलीये हे जाणून घेण्यासाठी सगळेच टीआरपी रिपोर्टची वाट बघत असतात. आता २४व्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये कोणत्या मराठी मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरल्या आहेत, ते जाणून घेऊया...
‘ठरलं तर मग’ या मालिकेने २४व्या आठवड्यातही ६.९चा टीआरपी मिळवून पहिलं स्थान कायम राखलं आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेमध्ये सध्या अतिशय रंजक वळण पाहायला मिळत आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. अगदी सुरुवातीपासूनच ही मालिका पहिले स्थान टिकवून आहे. सध्या या मालिकेत अर्जुन अन्यायाविरुद्ध लढताना दिसत आहे. तर सायली देखील त्याची साथ देताना दिसत आहे. सत्याच्या या लढाईत कुणाचा विजय होणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत सध्या रंजक वळण आले आहे. सतत भांडणारे कला आणि अद्वैत हे एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहेत. सध्या या मालिकेत कला पेढीवर जाऊन अद्वैतच्या लॅपटॉपमधून सगळे सीसीटीव्ही फूटेज घेते आणि सर्वांना दाखवते. त्यामध्ये सदा काजोलच्या बॅगेत अंगठ्या टाकताना दिसत आहे. त्यामुळे काजोलही निर्दोष असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामुळे आता मालिकेत रंजक वळण पाहायला मिळत आहे. या मालिकेला ६.७चा टीआरपी मिळाला असून, मालिका दुसऱ्या स्थानावर आहे.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सावनी तिच्या लग्नासाठी गोखले आणि कोळी कुटुंबीयांकडे राहायला आली आहे. ती आल्यानंतरही शांत बसलेली नाही. मुक्ताच्या आयुष्यात सतत ढवळाढवळ करत असते. सागर तिला योग्य वेळी योग्य उत्तरे देताना दिसतो. पण आता या सगळ्याचा परिणाम मुक्ताच्या प्रकृतीवर झाल्याचे दिसत आहे. मुक्तासाठी सागर एकवीरा देवीकडे साकडं घालणार आहे. हातात दिवा घेऊन देवी पुढे उभा राहणार आहे. या मालिकेने ६.५चा टीआरपी मिळवत तिसरे स्थान पटकावले आहे.
‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेने गेल्या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेचा शेवट खूप गोड झाला. स्वराला तिचा बाबा मल्हार आणि आई वैदही अशा दोघांचं प्रेम मिळालं. तर, पीहूने देखील शुभंकरला आपला बाबा म्हणून स्वीकारले. त्यामुळे मालिका एका छानशा शेवटामुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. या मालिकेने जाताजाता ६.२चा टीआरपी मिळवून चौथे स्थान पटकावले.
‘घरोघरी मातीच्या चुली’ या नव्याने आलेल्या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. या मालिकेतील जानकी आणि हृषिकेश यांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. या मालिकेत सध्या वट पौर्णिमेचा सण साजरी होताना दिसत आहे. यात आता हृषिकेश आणि जानकी यांचं एकमेकांवरचं प्रेम पाहायला मिळणार आहे. ज्याप्रमाणे जानकीने ह्रषिकेशसाठी वट पौर्णिमेचं व्रत करत केलं आहे, त्याचं प्रमाणे हृषिकेश देखील जानकीसाठी हे व्रत केले आहे. या मालिकेने ५.९चा टीआरपी मिळवत पाचवे स्थान टिकवून ठेवले आहे.
संबंधित बातम्या