TRP Report Marathi Serial Week 36: मराठी मालिका विश्वात आता काही नवीन मालिकांनी एन्ट्री घेतली आहे. अशातच आता कोणत्या मालिकांना टीआरपीमध्ये स्थान मिळतंय याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. टीआरपी रिपोर्ट हा मालिकांच्या लोकप्रियतेचा पुरावाच आहे. आता मालिकांचा ३६व्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. यामध्ये कोणत्या मालिकांनी किती टीआरपी मिळवला आणि कोणती मालिका कितव्या स्थानी आहे, याचा लेखाजोखा आहे. चला तर एका नजर टाकूया या आठवड्याच्या टॉप ५ मालिकांवर...
‘ठरलं तर मग’ ही मालिका सातत्याने आपला पहिला नंबर टिकवून आहे. या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळत आहे. या आठवड्यातही मालिका पहिल्या स्थानी आहे. या मालिकेने ७.० टीआरपी रेटिंग मिळवले आहे. सध्या या मालिकेत अर्जुन सुभेदार प्रतिमा आत्याची खरी मुलगी कोण, हे शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहे. या मालिकेचं कथानक रंजक वळणावर पोहोचलं आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सतत दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानी दिसत आहे. या आठवड्यात ही मालिका दुसऱ्या स्थानावर असून, तिला ६.८ टीआरपी रेटिंग मिळाले आहे. या मालिकेत सध्या सावनी मुक्ता आणि सागर यांचा संसार उधळून लावण्याचे अनेक प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, मुक्त तिला तिच्या प्रत्येक कुटील डावाचे सडेतोड उत्तर देत आहे.
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेने ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेला मागे टाकत टीआरपी शर्यतीत तिसरे स्थान पटकावले आहे. या मालिकेला ३६व्या आठवड्यात ६.५चं टीआरपी रेटिंग मिळालं आहे. या मालिकेत आता तेजस मानसीला राहण्यासाठी त्यांच्या घरी घेऊन आला आहे. मात्र, गायत्रीच्या त्रासापासून मानसीला लांब ठेवण्यासाठी त्याने एक नाटक सुरू केलं आहे.
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेतील कला आणि अद्वैत यांच्या नात्यातील नवे वळण आता सगळ्यांनाच आवडू लागले आहे. या मालिकेला ३६व्या आठवड्यात ६.५चे रेटिंग आणि चौथे स्थान मिळाले आहे. सध्या या मालिकेत कला आपले घर वाचवण्यासाठी शक्य तितकी मेहनत करताना दिसतेय. तर, अद्वैत देखील तिला या सगळ्यात मदत करत आहे.
या आठवड्याच्या टॉप ५मध्ये मालिकेला नव्हे तर एक विशेष कार्यक्रमाला पाचवे स्थान मिळाले आहे. ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४’ या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सादर करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमाला ६.४ इतका टीआरपी मिळाला आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांनी खास सादरीकरण केले होते.