TRP Report Marathi Serial Week 32: मराठी मालिका विश्वात सध्या मालिकांची भरपूर चर्चा आहे. काही मालिकांमध्ये धमाकेदार वळण पाहायला मिळत आहे. तर, काही मालिका अगदीच रटाळवाण्या कथानकावर असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. काही मालिका यंदा आपल्या स्थानावरून घसरलेल्या दिसत असल्या तरी, त्यांनी टॉप ५मध्ये आपलं स्थान कायम ठेवलं आहे. नुकताच ३२व्या आठवड्याचा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये एका मराठी मालिकेची जागा घसरल्याचं चित्र दिसत आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या मालिकांनी मारलीये बाजी...
‘ठरलं तर मग’ या मालिकेने नेहमीप्रमाणे आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. या मालिकेला पुन्हा एकदा भरपूर टीआरपी रेटिंग मिळालं असून, प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेला ६.८चा टीआरपी मिळाला आहे. या मालिकेत आता सायली प्रतिमा आत्याच्या आठवणी परत याव्यात म्हणून प्रयत्न करताना दिसतेय. तर, आता तिच्या याच प्रयत्नांना हळूहळू यश मिळणारा दिसत आहे.
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेच्या कथानकाला आता सर्वाधिक पसंती मिळताना दिसत आहे. या मालिकेने ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेला मागे ढकललं आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने या आठवड्यात दुसरे स्थान पटकावले आहे. या मालिकेला ६.५चा टीआरपी मिळाला आहे. या मालिकेत सध्या कला आणि अद्वैत यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले आहेत.
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेला या आठवड्यात तिसरं स्थान मिळालं आहे. या मालिकेला ३२व्या आठवड्यात ६.५चा टीआरपी मिळाला आहे. या मालिकेचे स्थान घसरले असले, तरी या मालिकेने टॉप ५मधील स्थान टिकवून ठेवलं आहे. या मालिकेत सध्या सावनी मुक्ता आणि सागर यांना वेगळं करण्यासाठी वेगवेगळे डाव खेळत आहे. मात्र, तिच्या या खेळांना आता दोघेही चोख प्रत्युत्तर देत आहेत.
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. या मालिकेला सुरुवातीपासूनच टीआरपीमध्ये चौथे स्थान मिळाले आहे. ३२व्या आठवड्यात या मालिकेने ६.३चा टीआरपी मिळवला आहे. या मालिकेत सध्या मानसीचं लग्न मोडल्याच्या धक्क्याने तिच्या वडिलांचं निधन झालं आहे. तर, तेजस तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याला ही गोष्ट कळणार आहे.
‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका आपलं पाचवं स्थान टिकवून आहे. या मालिकेला ३२व्या आठवड्यात ६.३चा टीआरपी मिळाला आहे. या मालिकेत आता सारंग घरी परतताना दिसणार आहे. जीवघेण्या अपघातातून सारंगचे प्राण वाचले आहेत. मात्र, आता सुमित्रा आईकडून जानकी आणि हृषिकेश यांना सावत्र वागणूक मिळत आहे. या मालिकेत आता रंजक वळण आले आहे.