TRP Report Marathi Serial Week 31: मराठी मालिका विश्वात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे काही नव्या मालिका छोट्या पडद्यावर दाकाहाल झाल्या आहेत. तर, दुसरीकडे काही जुन्या मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेण्याच्या वळणावर पोहोचल्या आहेत. अशातच आता मराठी मालिकांचा ३१व्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये कोणत्या मालिकांनी ‘टॉप ५’मध्ये बाजी मारली, ते समोर आले आहे. चला तर टाकूया एक नजर...
‘ठरलं तर मग’ या मालिकेने पुन्हा एकदा नंबर वन पटकावला आहे. ही मालिका गेल्या अनेक आठवड्यांपासून आपलं पहिलं स्थान टिकवून आहे. या मालिकेत सध्या अतिशय रंजक कथानक पाहायला मिळत आहे. प्रतिमा आत्या अनेक वर्षांनी घरी परत आल्या असून, यामुळे सगळेच सुभेदार खूप आनंदात आहेत. मात्र, या सगळ्यात आता खोट्या तन्वीचं पितळ उघडं पडणार आहे. या मालिकेला ७.०चा टीआरपी मिळाला आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने पुन्हा एकदा दुसरं स्थान बळकावलं आहे. काही आठवड्यांपूर्वी ही मालिका तिसऱ्या स्थानावर घसरली होती. मात्र, आता पुन्हा एकदा तिने आपलं दुसरं स्थान मिळवलं आहे. या मालिकेत सध्या मुक्ता आपलं सागरवरील प्रेम जाहीर करणार होती. मात्र, सावनीने खेळलेल्या डावामुळे आता मुक्ताला माघार घ्यावी लागणार आहे. या मालिकेला ६.७चा टीआरपी मिळाला आहे.
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत आता कलाच्या हातातील कला अद्वैतसमोर आली आहे. कलाच लपूनछपून दागिन्यांच्या डिझाईन बनवत होती, हे आता अद्वैतला कळलं आहे. त्यामुळे चिडलेल्या अद्वैतने कलाला काम करण्यास मनाई केली. मात्र, कलाने मी काम करणारच असं त्याला ठणकावून सांगितलं आहे. तर, दुसरीकडे आता अद्वैतलाच आता कलाच्या मदतीची गरज लागणार आहे. या मालिकेला ६.५चा टीआरपी मिळाला आहे.
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेत आता मानसीच्या लग्नात अडथळे येणार आहेत. भर मांडवातच मानसीचं लग्न मोडल्यामुळे तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका येणार आहे. या सगळ्यात तेजस मानसीची साथ देताना दिसणार आहे. त्यामुळे आता मानसीचे वडील तिचा हात तेजसच्या हातात देणार आहेत. अल्पावधीतच ही मालिका भरपूर लोकप्रियता मिळवत आहे. या मालिकेला ६.३चा टीआरपी मिळाला आहे.
‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत आठवडाभर भरपूर ड्रामा पाहायला मिळाला. मात्र, याचा फारसा फरक प्रेक्षकांवर पडलेला दिसत नाहीये. ही मालिका आपलं पाचवं स्थान टिकवून आहे. या आठवड्यात मालिकेत हृषिकेशच्या जन्माचं सत्य समोर आल्यानंतर रणदिवे कुटुंबात नवा वाद सुरू झाला आहे. आता ऐश्वर्या सारंगला कंपनीत नेऊन मालकाच्या खुर्चीवर बसवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. मात्र, याच दरम्यान एक धक्कादायक वळण येणार आहे. या मालिकेला ३१व्या आठवड्यात ५.९चा टीआरपी मिळाला आहे.