TRP Report Marathi Serial: मराठी मालिकांचा २८ व्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. या आठवड्यातही काही मराठी मालिकांनी प्रेक्षकांची भरघोस पसंती मिळवली आहे. मात्र, पुन्हा त्याच मालिकांचा दबदबा पाहायला मिळाला आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून या मालिका टीआरपी शर्यतीत ‘टॉप ५’मध्ये आपलं स्थान मिळवताना दिसत आहेत. या आठवड्यातही सायली आणि अर्जुनच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेने पहिली जागा पटकावली आहे. तर, हृषिकेश आणि जानकीच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेने पाचवे स्थान पटकावले आहे.
‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या रंजक वळणावर आली असून, मालिकेने प्रेक्षकांना चांगलंच गुंतवून ठेवलं आहे. सध्या मालिकेत अर्जुन प्रियासोबत प्रेमाचा नाटक करताना दिसतोय. तर, या नाटकात त्याला सायलीची साथ मिळतेय. अर्जुन आणि सायलीचा हा नवा प्लॅन आश्रम खुनाच्या केसमध्ये काही मोठी गोष्ट समोर आणू शकतो का, हे पाहणं रंजक ठरणार आहे. या मालिकेने २८ व्या आठवड्यात ६.९चा टीआरपी मिळवत पहिले स्थान कायम ठेवले आहे.
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत आता कला आणि अद्वैत यांच्यात प्रेम फुलताना दिसत आहे. कला नेहमीच अद्वैतला त्याच्या वागण्याचा आरसा दाखवत असते. अद्वैत आणि कलामध्ये नवरा-बायकोचं नातं नसलं, तरी दोघेही एकमेकांना सांभाळून घेताना दिसतात. कलाने अद्वैतपासून दूर राहावं म्हणून त्याची आई सतत काही ना काहीतरी टोमणे मारत असते. अद्वैत आजोबांशी फटकून वागल्याने कलाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चिडलेल्या अद्वैतने कलालाच बोल सुनावले. मात्र, आता अद्वैतला आपली चूक उमगली असून, तो कलाची माफी मागताना दिसणार आहे. या मालिकेने ६.७चा टीआरपी मिळवत आपले दुसरे स्थान कायम ठेवले आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत आता सावनी आणि मुक्ता यांच्यातील लढा एका वेगळ्याच वळणावर जाताना दिसणार आहे. सावनीचं हर्षवर्धन बरोबर लग्न लावून द्यायचं म्हणून मुक्ता आणि सागर दोघेही प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, हर्षवर्धन आदित्यच्या मनात मुक्ताविषयी विष कालवत आहे. ज्या बाईनं तुझ्या आईला एका त्रास दिला, आपण तिला त्रास द्यायचा, असं म्हणत हर्षवर्धन त्या छोट्याशा मुलाकडून वाईट गोष्टी करून घेत आहे. या मालिकेने ६.५चा टीआरपी मिळवत आपले तिसरे स्थान कायम ठेवले आहे.
नव्यानं छोट्या पडद्यावर दाखल झालेली ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंती उतरली आहे. २८ व्या आठवड्यात या मालिकेने ६.५चा टीआरपी पटकावला आहे. या मालिकेत तेजस सध्या गायत्रीने दिलेले आव्हान पूर्ण करताना दिसणार आहे. दोन आठवड्यात दोन लाख रुपये जमा करून द्यायचे, तरच हे प्रभुनिवास माझ्या तावडीतून सुटेल, असं आव्हान तिने तेजसला दिले होते. तर, तेजसने देखील आपली किमया करून दोन लाख रुपये जमा केले आहेत.
‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेने आपले पाचवे स्थान कायम ठेवले असून, या आठवड्यात मालिकेने ५.९चा टीआरपी मिळवला आहे. या मालिकेत सध्या हृषिकेश आणि जानकी यांच्या लग्नाचा सोहळा रंगताना पाहायला मिळत आहे. मात्र, या दरम्यान जानकी आणि हृषिकेश यांच्या आयुष्यात एक मोठं धक्कादायक वळण येणार आहे. हृषिकेश हा सुमित्रा आईचा सावत्र मुलगा असल्याचं सत्य आता त्यांच्यासमोर येणार आहे.
संबंधित बातम्या