TRP Report Marathi Serial: या वर्षाच्या म्हणजेच २०२४च्या २६व्या आठवड्याचा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. यामध्ये आठवडाभरात कोणकोणत्या मालिकांनी बाजी मारत प्रेक्षकांची मन जिंकून घेतली याचा लेखाजोखा आहे. सध्या नव्या मालिका बाजी मारताना दिसत असून, जुन्या मालिकांना धोबीपछाड मिळत आहे. या आठवड्यात ‘टॉप ५’ मराठी मालिका कोणत्या आहेत, एका नजर टाकूया ‘टीआरपी रिपोर्ट’वर...
‘ठरलं तर मग’ या मालिकेने अजूनही आपली लोकप्रियता कायम ठेवली आहे. २६व्या आठवड्यात देखील ‘ठरलं तर मग’ या मालिकेने पहिलं स्थान पटकावलं आहे. सायली आणि अर्जुन यांच्या या मालिकेला ६.९चा टीआरपी मिळाला आहे. या मालिकेत सध्या अनेक चांगल्या गोष्टी घडताना दिसत आहेत. एकीकडे प्रियाने आपली चूक काबुल केली आहे. तर, दुसरीकडे आता पूर्णा आजी सायलीला नातसून म्हणून स्वीकारताना दिसणार आहे. या सगळ्यातच सायली आणि अर्जुन यांचं प्रेम बहरून येणार आहे.
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने आपलं दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. या मालिकेला देखील प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने २६व्या आठवड्यात ६.७ इतका टीआरपी मिळवला आहे. या मालिकेत आता कला आणि अद्वैत यांची प्रेम कहाणी हळूहळू सुरू होताना दिसत आहे. दोघांनीही आता आपापले वाद मिटवण्यास सुरुवात केली आहे.
मुक्ता आणि सागर यांच्या आयुष्याची कथा सांगणाऱ्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेला टीआरपी शर्यतीत तिसरे स्थान मिळाले आहे. या मालिकेने २६व्या आठवड्यात ६.६चा टीआरपी मिळवला असून, तिसरं स्थान कायम ठेवलं आहे. या मालिकेत आता मुक्ता आणि सागर मिळून सावनीचं लग्न लावून देताना दिसणार आहे. मात्र, या दरम्यान देखील सावनी दोघांच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होणार आहेत.
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या नव्या मालिकेने अल्पावधीत लोकप्रियता मिळवायला सुरुवात केली आहे. या मालिकेला ६.५चा टीआरपी मिळाला आहे. मानसी आणि तेजस हे या कथेचे मुख्य पात्र आहेत. सरकारी कामांच्या नावाखाली लोकांना लुटण्याचं काम करून तेजस गायत्री वहिनींचे पैसे परत करण्याचं काम करतोय. तर, सालस आणि निरागस गायत्रीशी आता त्याची भेट त्याचं आयुष्य बदलून टाकणारी ठरणार आहे.
‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेने टीआरपी शर्यतीत आपलं पाचवं स्थान टिकवून ठेवलं आहे. या मालिकेला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ६.१चा टीआरपी मिळवत या मालिकेने टॉप ५ मालिकांमध्ये आपलं स्थान कायम ठेवलं आहे. या मालिकेत आता हृषिकेश आणि जानकी यांच्या लग्नाचा सोहळा पाहायला मिळणार आहे. तर, हृषिकेश हा सारंगचा सावत्र भाऊ असल्याचं सत्य ऐश्वर्यासमोर येणार आहे.