पंचम निषाद आणि यशवंतराव चव्हाण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तीन सूर तीन ताल - संगीतमय तिहाई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम जगविख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांना समर्पित असून गायन आणि वादनाच्या माध्यमातून युवा कलाकार त्यांना स्वर आदरांजली वाहणार आहेत. वाय. बी. चव्हाण सभागृह नरिमन पॉईंट, मुंबई येथे रविवार, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता होणार असून कार्यक्रम दिवसभर चालणार आहे.
उस्ताद झाकीर हुसेन शरीररूपाने आज आपल्यात नसले तरी त्यांच्या संगीतातून, प्रत्येक ठेक्यातून, लयीतून त्यांची उपस्थिती आजही आपल्यात आहे. त्यांची अतुलनीय कला, नम्रता आणि भारतीय शास्त्रीय संगीताप्रती असलेली त्यांची ओढ कायम आहे. त्यांच्या वादनातून अनेक पिढ्यातील कलाकार व रसिकांना प्रेरणा मिळाली आहे. तीन सूर तीन ताल या कार्यक्रमाची संकल्पना पंचम निषाद क्रिएटिव्हजचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक शशी व्यास आणि उस्ताद झाकीर हुसेन यांच्यातील एका अनौपचारिक संभाषणातून जन्माला आली होती. युवा कलाकारांना त्यांची प्रतिभा दर्शविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या उपक्रमाला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. कंठस्वर: गायन, स्वरवाद्य : वाद्य संगीत आणि तालवाद्य : तालवाद्य वादन यांचा या कार्यक्रमात समावेश आहे. यावेळी उस्ताद झाकीर हुसेन यांच्या सांगीतिक क्षेत्रातील योगदानाविषयी ज्येष्ठ तबला वादक योगेश सामसी बोलणार आहेत.
कार्यक्रम तीन सत्रात होणार आहे. पहिल्या सत्रात सकाळी ९:१५ वाजता विवेक पंड्या यांचे एकल तबला वादन, सकाळी १०:१५ वाजता मेहताब अली नियाझी यांचे सतारवादन, ११:३० वाजता अनिरुद्ध ऐठल यांचे गायन होणार आहे. या कलाकारांना अजय जोगळेकर (लहेरा), खुर्रम (तबला), स्वप्नील भिसे (तबला), सिद्धेश बिचोलकर (संवादिनी) साथसंगत करणार आहेत.
दुसऱ्या सत्रात दुपारी २ वाजता इशान घोष यांचे एकल तबलावादन होणार असून त्यांना साबीर खान सारंगीसाथ करणार आहेत. दुपारी ३ वाजता एस. आकाश यांचे बासरीवादन होणार असून आदित्य कल्याणपूर तबलासाथ करणार आहेत. ४:१५ वाजता अरमान खान यांची गायन मैफल होणार असून त्यांना सुरजित सिंग (तबला), नचिकेत (संवादिनी) साथ करणार आहेत.
सायंकाळी ६ वाजता तिसऱ्या सत्राची सुरुवात यशवंत वैष्णव यांच्या एकल तबला वादनाने होणार आहे. त्यांना साबीर खान सारंगी साथ करतील. सायंकाळी ७ वाजता मोमिन खान यांचे सारंगी वादन होणार असून अनुब्रता चॅटर्जी यांची तबलासाथ आहे. सायंकाळी ८:१५ वाजता गंधार देशपांडे यांचे गायन होणार असून त्यांना यती भागवत (तबला), सुधांशु घारपुरे (संवादिनी) साथ करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून काही जागा राखीव आहेत. G
संबंधित बातम्या