बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला ही तिच्या काळातील सुंदर आणि टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. आजही तिच्या काही व्यक्तिरेखा चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. दरम्यान, जुहीबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे, जो ऐकून तिचे चाहते आनंदाने उड्या मारत आहेत. या रिपोर्टमध्ये जुहीने बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांना देखील मागे टाकले आहे. हुरुन इंडियाच्या टॉप १० सेल्फमेड महिलांच्या यादीत जुही चावलाने स्थान मिळवले आहे. या यादीत ती सहाव्या क्रमांकावर आहे. जुहीने दहा वर्षांपासून एकही चित्रपट केलेला नाही आणि ती आयपीएलमध्ये केकेआर संघाची सहमालकीण आहे.
नेटवर्थ लिस्टनुसार जूही चावलाची एकूण संपत्ती ४६०० कोटी रुपये आहे. जुहीने १९९५ मध्ये मेहता ग्रुपचे चेअरमन जय मेहता यांच्याशी लग्न केले. जुही आणि जय मेहता आपल्या दोन मुलांसह मलबार हिलमधील एका अपार्टमेंटमध्ये राहतात. जुही ही आयपीएलची टीम केकेआरची सहमालकीण आहे. त्यामुळे जुहीला शाहरुखचा नेहमी पाठिंबा मिळतो. फोर्ब्स २०२२ च्या अहवालानुसार, केवळ केकेआरच्या टीमची किंमत ही ९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांची नावेही आहेत. शाहरुख खान ७ हजार कोटींहून अधिक संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जुही चावला आहे, तिची नेटवर्थ ४६०० कोटी रुपये आहे. या यादीत ती बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. इतकंच नाही तर या यादीत हृतिक रोशन, अमिताभ बच्चन, करण जोहर सारख्या बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित लोकांचाही समावेश आहे.
वाचा: ‘तारक मेहता...’ मालिकेतील अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नाच्या ७ वर्षांनंतर पतीपासून विभक्त होणार!
जुही चावला १९८४ मध्ये मिस इंडिया बनली होती. यानंतर तिने कयामत से कयामत तक, येस बॉस, हम हैं राही प्यार के, इश्क आणि लुटे यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले. याशिवाय जुही आणि शाहरूख खान हे केकेआरचे मालक देखील आहेत. शिवाय दोघांनीही अनेक सिनेमे एकत्र केले आहेत. दोघेही डर, राजू बन गया जेंटलमन, राम जाने, येस बॉस, फिर भी दिल है हिंदुस्तानी यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत. जुही गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या फ्रायडे नाईट प्लॅन या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात जुहीव्यतिरिक्त बाबिल खान मुख्य भूमिकेत होता.