Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो गेल्या १६ वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जुना सोढी म्हणजे अभिनेता गुरचरण सिंह सुरुवातीपासूनच या मालिकेत काम करत होता. मात्र, जेव्हा हा शो चार वर्ष सतत टेलिकास्ट झाला, तेव्हा गुरुचरणने निर्मात्यांशी त्याच्या फीबद्दल चर्चा केली. त्यावेळी निर्मात्यांनी त्याला न सांगताच नवीन सोढीला कास्ट केले. गुरुचरणने जेव्हा टीव्हीवर मालिकेचा नवीन भाग पाहिला, तेव्हा त्याला समजले की निर्मात्यांनी त्याच्या जागी नवीन अभिनेत्याला घेतले आहे. याचा खुलासा खुद्द स्वतः गुरुचरण सिंह यानेच केला आहे.
सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या मुलाखतीत गुरुचरण म्हणाला की, ‘तारक मेहताची संपूर्ण टीम माझ्या कुटुंबासारखी आहे. जर मी त्यांना माझं कुटुंब मानत नसतो, तर त्यांच्याबद्दल मी बऱ्याच गोष्टी बोललो असतो, ज्या मी आजवर बोललेलो नाही.' गुरुचरण म्हणाला की, ’२०१२मध्ये मी हा शो सोडला नव्हता. त्याने माझी जागा दुसऱ्या अभिनेत्याला दिली होती.'
गुरुचरण सिंह पुढे म्हणाला की, ‘मालिकेला ४ वर्ष पूर्ण झाली होती. त्यावेळी मी तारक मेहताच्या निर्मात्यांशी माझ्या कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलत होतो. पगारवाढ करण्याविषयी चर्चा सुरू होती. तेव्हा त्यांनी मला सांगितले नाही की, ते माझ्या जागी दुसरा अभिनेता घेणार आहेत. त्यावेळी मी दिल्लीत होतो आणि माझ्या कुटुंबासमवेत तारक मेहता पाहत होतो. कारण त्या एपिसोडमध्ये धरम पाजी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. याच एपिसोडमध्ये त्यांनी नव्या सोढीची ओळख करून दिली. शोमध्ये नवीन सोढी पाहिल्यावर मला धक्काच बसला.’
गुरुचरण याने आपल्या मनातील भावना व्यक्त करताना सांगितले की, 'मला रिप्लेस केल्यानंतर निर्मात्यांवरील दबाव वाढू लागला होता. सोशल मीडियावर लोकांनी निर्मात्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. जेव्हा, मी जिममध्ये जायचो तेव्हा लोक मला विचारायचे की, तू का मालिका सोडून गेलास? पण, त्यावेळी माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मी फक्त म्हणायचो की 'मी नाही, बॉसच सगळे निर्णय घेतो'.' आपल्याप्रमाणे अभिनेत्री जेनिफरलाही या शोमधून रिप्लेस करण्यात आल्याचेही गुरुचरणने मुलाखतीत सांगितले. मात्र, वर्षभरानंतर गुरुचरण याला मालिकेत परत बोलावण्यात आले. त्यानंतर गुरुचरणने २०२०पर्यंत या शोमध्ये काम केले होते.