TMKOC Fame Bhavya Gandhi Back On TV: टीव्हीवरील प्रसिद्ध हिंदी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हा शो छोट्या पडद्यावरील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या शोपैकी एक आहे. या मालिकेत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना प्रेक्षकांनी लहान असल्यापासून ते मोठे होईपर्यंत वाढताना पाहिलं आहे. या शोचा असाच एक लोकप्रिय कलाकार म्हणजे अभिनेता भव्य गांधी. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमध्ये भव्यने 'टप्पू'ची भूमिका साकारून बरीच लोकप्रियता मिळवली होती. मात्र, भव्य याने काही वर्षांपूर्वी असित मोदींचा हा शो सोडला होता. बऱ्याच काळानंतर भव्य गांधी पुन्हा एकदा टीव्हीवर कमबॅक करणार आहे. यावेळी भव्यची व्यक्तिरेखा पूर्णपणे वेगळी असणार आहे. जाणून घेऊया त्याच्या या नव्या शोबद्दल...
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील जुना टप्पू म्हणजेच अभिनेता भव्य गांधी तब्बल ५ वर्षांनंतर टीव्हीवर पुनरागमन करत आहे. भव्य यावेळी एका खास भूमिकेत दिसणार आहे. 'पुष्पा इम्पॉसिबल' या मालिकेत तो एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. यात भव्य गांधी निगेटिव्ह कॅरेक्टर असलेल्या प्रभासच्या भूमिकेत दिसणार आहे. भव्य पहिल्यांदाच खलनायकाच्या अवतारात दिसणार आहे. भव्यला खलनायकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
'पुष्पा इम्पॉसिबल' या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये भव्य त्याला मिळालेल्या थप्पडच्या सूडाच्या आगीत जळत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या शोमध्ये भव्य त्याच्या आधीच्या निरागस आणि खोडकर प्रतिमेपेक्षा पूर्णपणे वेगळा दाखवण्यात आला आहे. प्रेक्षकांना हा प्रोमो खूप आवडत आहे. शोचा प्रोमो शेअर करत निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘राशीला वाचवण्याच्या प्रयत्नात अश्विन मोठ्या अडचणीत येईल का....’ सोनी सबवर सोमवार आणि शनिवारी रात्री ९.३५ वाजता हा शो प्रसारित होत आहे.
‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये प्रभासची भूमिका साकारण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना भव्य गांधी म्हणाला की, ‘प्रभासची भूमिका साकारणे हा माझ्यासाठी चांगला अनुभव आहे. कारण मी पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारत आहे आणि ही भूमिका निरागस टप्पूच्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’पेक्षा हा शो वेगळा असणार आहे. प्रभास एक अप्रत्याशित आणि खूप त्रासदायक पात्र आहे. तो बाहेरून शांत दिसत असला, तरी आतून तितकाच प्रखर, अराजकता माजवण्यास तयार आहे. तो स्वतःच्या आत खूप काही दडवून बसलेला आहे. इतक्या गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखेसह छोट्या पडद्यावर परतणे माझ्यासाठी अतिशय रोमांचक आहे.’