Tishaa Kumar Funeral Viral Video: सध्या बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये शोककळा पसरली आहे. अभिनेता आणि निर्माते आणि टी-सीरिजचे सहमालक कृष्ण कुमार यांची मुलगी तिशा कुमार हिचा १८ जुलै रोजी मृत्यू झाला होता. २० वर्षांची तिशा कुमार कॅन्सरशी झुंज देत होती. मात्र, तिचा हा लढा अपयशी ठरला. तिशा कुमार हिने जर्मनीत अखेरचा श्वास घेतला. तिशा कुमारच्या मृत्यूनंतर चार दिवसांनी म्हणजेच आज, २२ जुलै रोजी तिच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. कृष्ण कुमार यांच्या मुलीला शेवटचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडचे कलाकार देखील अंत्यसंस्काराला हजर होते.
टी-सीरीजचे सहमालक आणि अभिनेता कृष्ण कुमार यांची मुलगी तिशा कुमारने वयाच्या २०व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आपल्या लेकीला शेवटचा निरोप देताना कृष्ण कुमार बेशुद्ध देखील झाले होते. बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता कृष्ण कुमार यांची मुलगी तिशा कुमार हिचे कर्करोगाने निधन झाले. तिशाच्या मृत्यूला चार दिवस झाले असून, आज तिच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मुंबईत सध्या मुसळधार पाऊस पडत असला, तरी तिशाला श्रद्धांजली वाहण्यासाठी चित्रपटसृष्टीतील स्टार्स तिथे आले होते. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यामध्ये फुलांनी सजलेली एक मोठी व्हॅन दिसत आहे, ज्यामध्ये तिशाचे पार्थिव ठेवण्यात आले होते. यावेळी आपल्या लेकीला शेवटचा निरोप देताना कृष्ण कुमार यांना देखील अश्रू अनावर झाले होते. तर, कोसळणारा पाऊस देखील एका बापाचे अश्रू लपवू शकला नाही.
टी-सीरिजने २० वर्षीय तिशाच्या निधनावर एक निवेदन जारी केले होते, ज्यामध्ये कृष्ण कुमार यांची मुलगी तिशा कुमार हिचे एका आजाराशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर काल निधन झाल्याचे म्हणण्यात आले होते. यात त्यांनी म्हटले होते की, कुटुंबासाठी हा अतिशय कठीण काळ आहे आणि आम्ही विनंती करतो की, कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर केला जावा.
मीडिया रिपोर्टनुसार, तिशाला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. तिच्या कुटुंबाने तिला जर्मनीला उपचारासाठी नेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, उपचारादरम्यान जर्मनीतच तिचा मृत्यू झाला. तिशा कुमार शेवट नोव्हेंबर २०२३मध्ये एका कार्यक्रमात दिसली होती. रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी, अनिल कपूर आणि बॉबी देओल अभिनीत संदीप रेड्डी वंगा यांच्या 'ॲनिमल'च्या स्क्रीनिंगमध्ये तिशा शेवटची दिसली होती. या चित्रपटाची निर्मिती टी-सीरीजने केली असून, यादरम्यान तिशाने तिचे वडील कृष्ण कुमारसोबत रेड कार्पेटवर पोज देताना दिसली होती.
संबंधित बातम्या