Prathamesh Parab Love Story: ‘टाईमपास’ या चित्रपटातून अवघ्या मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता प्रथमेश परब आता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. प्रथमेश परब याचा साखरपुडा पार पडला असून, क्षितिजा घोसाळकर असं त्याच्या पत्नीचं नाव आहे. प्रथमेशच्या लग्नाची लगबग आता सुरू झाली असून, अभिनेता सध्या केळवणाचा आस्वाद घेत आहे. नुकतीच त्याने एका मनोरंजन पोर्टलला मुलाखत दिली. यात त्याने आपल्या लव्हस्टोरीची सुरुवात कशी झाली, हे सांगितलं आहे. क्षितिजा आणि प्रथमेश यांची प्रेमकथा देखील अगदी फिल्मी आहे.
‘टाईमपास’ या चित्रपटाने सगळ्याच अर्थाने प्रथमेशच्या आयुष्याला कलाटणी दिली होती. क्षितिजा आणि त्याच्या प्रेमकथेची सुरुवात देखील या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच झाली होती. खरंतर प्रथमेश परब यालाच क्षितिजा पहिल्यांदा आवडू लागली होती. मात्र, या नात्याची आणि प्रेमाची कबुली क्षितिजाने पहिल्यांदा दिली. क्षितिजा ही स्वतः एक चांगली लेखिका आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारी क्षितिजा घोसाळकर हि देखील अभिनेत्री आहे. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच या दोघांची पहिली भेट झाली होती.
क्षितिजा घोसाळकर हिने तिच्या सोशल मीडियावर तिची एक सीरिज शेअर केली होती. तर, प्रथमेशला तिची सीरिज आणि त्यातील क्षितिजाचं लिखाण खूप आवडलं होतं. प्रथमेशने स्वतः तिला मेसेज करून आपली प्रतिक्रिया कळवली होती. मात्र, क्षितिजाने प्रथमेशचे मेसेजेस पाहिलेच नव्हते. म्हणून त्याने पुन्हा दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तिच्याशी संपर्क साधला. इथूनच त्यांच्यात संवादाला सुरुवात झाली होती. हळूहळू रोजच दोघांच्या गप्पा होऊ लागल्या. काहीच दिवसांत त्यांची छान मैत्री देखील झाली. मात्र, या गप्पा फोनवरूनच सुरू होत्या. त्यांची प्रत्यक्षात भेट झाली नव्हती.
याच दरम्यानच्या काळात प्रथमेश परब याच्या ‘टाईमपास’ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं होतं. या चित्रपटाचं शूटिंग ठाण्यात सुरू असताना दोघांनी पहिल्यांदा भेटायचं ठरवलं होतं. भेटूया का? असं एकेमेकांना विचारल्यावर दोघांची उत्तरं हो असल्याने त्यांच्या पहिल्या भेटीला अखेर मुहूर्त सापडला. या पहिल्या भेटीतच क्षितिजाने प्रथमेशला आपल्या मनातील प्रश्न विचारून टाकला. ‘आपण रिलेशनशिपमध्ये येऊया का?’ असं पहिल्यांदा क्षितिजाने विचारलं. यावर प्रथमेशने देखील होकार दिला. आता त्यांची हिच प्यारवाली लव्हस्टोरी लग्नापर्यंत पोहोचली आहे.