Tiger Shroff New Home In Pune: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्ये खतरनाक स्टंट करून यश मिळवणारा टायगर श्रॉफ आता पुणेकर होणार आहे. अभिनेता टायगर श्रॉफ याने पुण्यात एक आलिशान घर विकत घेतलं आहे. मुंबईनंतर त्याने आता पुण्यातही आलिशान घर घेतले आहे. या घराची किंमत ऐकून तुमचेही डोळे नक्कीच पांढरे होतील. इतके महागडे घर घेण्याचे स्वप्न एखादा बॉलिवूड सेलिब्रिटीच पाहू शकतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता टायगर श्रॉफ याने पुणे शहरात तब्बल ७.५ कोटी रुपयांचे नवीन घर खरेदी केले आहे. त्याची ही आलिशान मालमत्ता ४२४८ चौरस फुटांची असून, हडपसरमधील प्रीमियम ‘यु पुणे’ प्रकल्पाचा भाग आहे. स्थानिक रिअल इस्टेट हेवीवेट पंचशील रियल्टीद्वारे बांधली जात आहे. यासाठी टायगरने तब्बल ५२.५ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. टायगर श्रॉफने ५ मार्च २०२४ रोजी नोंदणी करून ही रक्कम भरल्याचे बोलले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही मालमत्ता तात्काळ लीजवर देण्यात आली आहे. आता टायगरला या मालमत्तेसाठी दरमहा सुमारे साडेतीन लाख रुपये भाडे मिळत आहे. या भाड्यातून त्याला भरपूर नफा मिळणार आहे. या पाच वर्षांच्या भाडे करारामुळे अभिनेत्याची ५ टक्क्यांहून अधिक बचत होणार आहे. याचा अर्थ असा की, आता या घरातूनही अभिनेत मोठा नफा कमावणार आहे. टायगर श्रॉफ स्वतः या घरात राहायला जाणार का?, मुंबईहून पुण्यात स्थायिक होणार का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. मात्र, सध्या तरी टायगर श्रॉफ हा पुण्यात शिफ्ट होणार नाही. अभिनेता मुंबईतच राहून आपली अभिनय कारकीर्द सुरू ठेवणार आहे. त्याचा आगामी चित्रपट सध्या चर्चेत आहे.
लवकरच टायगर श्रॉफ बॉलिवूडच्या ‘खिलाडी’ अक्षय कुमारसोबत 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या दोघांची जोडी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. त्यांच्या या आगामी चित्रपटाविषयी बरीच चर्चा आहे. सध्या ते दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.
संबंधित बातम्या